Mohan Bhagwat New York Speech : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय अनिवासी नागरिकांना त्यांच्या कर्मभूमी आणि जन्मभूमी या दोन्हीप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. विविध आव्हानांचा सामना करणाऱ्या या जगाला यामुळे मोठा हातभार लागू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे ‘अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’ (AHEAD) द्वारे आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

मोहन भागवत म्हणाले की, भारतीय समुदायाने आपण राहत असलेल्या देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या आणि आपल्या जन्मभूमीशी असलेले नाते यामध्ये संतुलन राखल्यास, भारताचे व्यापक ध्येय पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. “जे लोक अमेरिका किंवा इतर देशांमध्ये राहत आहेत, ते त्यांच्या कर्मासाठी काम करतील. जर त्यांना वेळ मिळाला, जर त्यांना साधने मिळाली, तर ते भारताची काळजी घेऊ शकतात. पण भारताची तशी कोणतीही अपेक्षा नाही”, असं भागवत म्हणाले. ते पुढे म्हणाले, “भारताची तुमच्याकडून फक्त जगण्याची अपेक्षा आहे, कारण भारतानेच तुम्हाला जगण्याचा विचार दिला आहे.”

परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी आपण राहत असलेल्या देशाशी नेहमी बांधील राहिलं पाहिजे, यावरही त्यांनी भर दिला. मोहन भागवत म्हणाले, “आम्ही अमेरिकेत आहोत. आम्ही अमेरिकेत राहतो. आम्ही अमेरिकेत कमावतो. त्यामुळे आम्ही अमेरिका आहोत. आणि आम्ही अमेरिकेशी प्रामाणिकपणे वागले पाहिजे. हे अगदी खरे आहे.” ते पुढे म्हणाले की, परदेशातील भारतीयांचे त्यांच्या कर्मभूमीप्रती एक कर्तव्य आहे आणि ही जबाबदारी न डावलताही ते भारतासाठी योगदान देऊ शकतात. “त्यांनी ते कर्तव्य पूर्ण केलंच पाहिजे. त्यांनी आपल्या कर्माशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, कारण भारत ही त्यांची जन्मभूमी आहे”, असे ते म्हणाले.

या जबाबदाऱ्यांचा संबंध भारताच्या व्यापक ध्येयाशी जोडताना मोहन भागवत म्हणाले, “त्या ध्येयाच्या दिशेने पुढे जात असताना आपण आपल्या कर्मभूमी आणि जन्मभूमी या दोन्ही ठिकाणची कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. जर आपण असे केले, तर विविध समस्यांशी झगडणाऱ्या आणि प्रत्येक पावलावर अडखळणाऱ्या या जगासाठी हा एक मोठं वरदान ठरेल.”

या कार्यक्रमाच्या व्यापक संदेशाचा उल्लेख करत मोहन भागवत म्हणाले की, जगाला सध्या मानसिक बळ आणि आधाराची गरज आहे. “आपल्याला जगाला जगण्याची शक्ती द्यायची आहे. आपल्याला या जगाला काहीतरी आधार द्यायचा आहे”, असं ते म्हणाले. त्यांनी लोकांना स्वतःच्या आयुष्यात छोटे छोटे बदल करण्याचं आवाहन केले आणि सांगितलं की, वैयक्तिक कृतींमधून शाश्वत जीवनपद्धतीमध्ये योगदान दिलं जाऊ शकते.