न्यूयॉर्क : ‘‘अमेरिकेचा उल्लेख झाला की ‘बहुविधता’ हा शब्द समोर येतो; तर भारताचा विचार केला की ‘विविधतेतील एकता’ ही संकल्पना अधोरेखित होते. एकता आणि विविधता या दोन्ही गोष्टी भारताच्या ‘डीएनए’मध्येच आहेत,’’ असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमध्ये मांडले. आपण सर्व एकात्मतेने जोडलेले आहोत आणि विविधतेमुळे ही एकात्मता अधिक सुंदर बनते, असेही त्यांनी सांगितले.
‘अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’ (एएचईएडी फोरम) या संस्थेच्या वतीने न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे शनिवारी आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सरसंघचालक बोलत होते. भारत आणि अमेरिकेतील सांस्कृतिक मूल्यांची तुलना करत त्यांनी वैश्विक एकात्मतेचा संदेश दिला. ‘‘राष्ट्रे ही केवळ भौगोलिक सीमा नसतात, सृष्टीच्या व्यापक योजनेत प्रत्येक राष्ट्राला एक विशिष्ट कर्तव्य सोपवण्यात आलेले असते.
प्रत्येक राष्ट्राकडे जगाला देण्यासाठी एक संदेश, पूर्ण करण्यासाठी एक ध्येय आणि साकार करण्यासाठी एक नियती असते, असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते. भारताची नियती काय आहे? विविधतेत दडलेल्या एकात्मतेची अनुभूती घेणे आणि वेळोवेळी जगाला त्या एकात्मतेचे दर्शन घडवणे, हे भारताचे ध्येय आहे,’’ असे भागवत यांनी सांगितले.
मानवी समाजातील दोन प्रवृत्तींचा उल्लेख करताना सरसंघचालक म्हणाले, एक प्रवृत्ती ‘जगा आणि जगू द्या’ अशी आहे; तर दुसरी प्रवृत्ती ‘आमचे म्हणणे मानणार्यांनाच जगू द्या’ अशी आहे. ‘तुम्ही आमचे ऐका, आम्ही तुमचे रक्षण करू,’ अशी भूमिका घेणारी वृत्ती ही राक्षसी आहे. एखादा माणूस आमचे म्हणणे मानतो की नाही, आमच्याबद्दल काय विचार करतो किंवा आमच्यासाठी किती उपयुक्त आहे, यापेक्षा तो एक मानव आहे हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मानवतेचे रक्षण करण्यासाठी आणि जीवन टिकवण्यासाठी बंधुभावाने जगणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
शरीर, भाषा, संस्कृती, वेशभूषा आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाच्या अंत:करणात एकच चैतन्य आहे. म्हणूनच आपण सर्व एकमेकांशी जोडलेले आहोत. जे तत्त्व सर्वांना एकत्र जोडते, सर्वांचे अस्तित्व टिकवून ठेवते, संतुलन राखते, विभाजन टाळते आणि मध्यममार्गाचा पुरस्कार करते, त्यालाच धर्म म्हणतात, असे सांगत भागवत यांनी एकात्मतेची संकल्पना स्पष्ट केली.
पर्यावरणाविषयी जबाबदारी आवश्यक
‘‘आज आपण फादर डे, मदर डे यांसारखे दिवस साजरे करतो, कारण त्यातून आपल्याला आपल्या कर्तव्यांची आठवण होते. त्याचप्रमाणे पर्यावरणाप्रती असलेल्या जबाबदारीचीही जाणीव ठेवली पाहिजे. आपण जे अन्न खातो ते शेतीमुळे उपलब्ध होते. शेतकरी शेती करणे थांबवतील तर अन्न कुठून मिळणार? आपण वापरत असलेल्या वस्त्रांमागे शेतकरी, कामगार आणि उद्योगांचे योगदान असते. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट इतरांच्या परिश्रमांवर उभी आहे. त्यामुळे आपण जगाकडून जे काही घेतले आहे, ते जगाला परत देणे हे आपले कर्तव्य आहे,’’ असे भागवत यांनी सांगितले.
‘कोणी हल्ला केला, तर प्रतिकार आवश्यक’
नागपूर : सहिष्णुता हिंदूंच्या रक्तातच आहे आणि ते हिंदुत्वाचे एक मूलभूत तत्त्व आहे. परंतु कोणी हल्ला केला तर त्याला प्रतिकार करणे आवश्यक आहे. सहिष्णुता म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणे, सर्व धर्मांना सन्मान देणे होय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सरसंघचालकांच्या भाषणावर प्रतिक्रिया विचारली असता, तेथे ज्या तत्त्वावर चर्चा झाली, ते पूर्णपणे बरोबर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आपण सर्व एक आहोत आणि विविधतेमुळे आपल्या या एकतेला अधिक सौंदर्य प्राप्त होते. त्यामुळे विविधतेचा उत्सव साजरा केला पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे आणि तिचा स्वीकारही केला पाहिजे. त्याच वेळी, आपल्या मनात एकतेची भावना सदैव जागृत ठेवली पाहिजे.- मोहन भागवत, सरसंघचालक
मोहन भागवत यांनी दिशाभूल करू नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रक्तातच द्वेष आणि जातीयवाद आहे. – शमा मोहम्मद, काँग्रेस प्रवक्त्या परदेशात विविधता स्वीकारता, पण देशांतर्गत मात्र विविधता सहन करत नाही. – कपिल सिबल, राज्यसभा सदस्य
