राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या न्यू यॉर्कमधील प्रस्तावित कार्यक्रमावरून अमेरिकेत नवा वाद पेटला आहे. न्यू यॉर्कमधील जगप्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे आज (२९ ऑगस्ट) ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमाला न्यू यॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्यासह अमेरिकेतील हिंदू आणि विविध धार्मिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हिंदुस्तान टाईम्सने या संदर्भातील बातमी दिली आहे.

‘अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’ (AHEAD) या मंचाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील सामाजिक आणि धार्मिक वर्तुळात मोठे पडसाद उमटत आहेत.

६१ संघटनांचे विरोधाचे पत्र आणि निदर्शने

‘हिंदूज फॉर ह्युमन राइट्स’ या संघटनेच्या कार्यकारी संचालक सुनिता विश्वनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल ६१ आंतरधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष संघटनांनी एकत्र येत या कार्यक्रमाविरोधातील खुल्या पत्रावर (Open Letter) स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

“आरएसएस आणि त्यांची हिंदुत्वाची विचारधारा आमचे अजिबात प्रतिनिधित्व करत नाही, हा स्पष्ट संदेश देण्यासाठी आमचे अनेक समर्थक या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून विरोध नोंदवतील,” असे सुनिता विश्वनाथ यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी मंगळवारी ‘हिंदूज फॉर ह्युमन राइट्स’, ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल’ आणि ‘इंटरफेथ सेंटर ऑफ न्यू यॉर्क’ यांसारख्या प्रमुख संस्थांनी न्यू यॉर्क सिटी हॉलबाहेर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन हा कार्यक्रम तातडीने रद्द करण्याची मागणी केली होती.

“भारताची सर्वसमावेशक ओळख धोक्यात” – महापौर झोहरान ममदानी

न्यू यॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी या कार्यक्रमावरून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या आयोजनावर जोरदार निशाणा साधला.

“न्यू यॉर्क शहराचा पहिला भारतीय वंशाचा महापौर म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. माझ्या आईचे संपूर्ण कुटुंब आजही भारतात राहते. मी ज्या भारताच्या संकल्पनेचा विचार करत मोठा झालो, ती संकल्पना एका बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाची होती; जिथे प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि स्थान आहे,” असे ममदानी म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, “एखाद्या देशाला किंवा समाजाला एकांगी दृष्टिकोनातून पाहणाऱ्या चळवळीचा उदय होणे अत्यंत चिंताजनक आहे. माझा अशा विचारसरणीला ठाम विरोध आहे.” तथापि, हा एक खाजगी कार्यक्रम असल्याने तो रद्द करण्याचे कायदेशीर अधिकार स्थानिक प्रशासनाकडे बहुदा नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हिंदू अमेरिकन फाउंडेशनकडून सुरक्षेचा इशारा

दुसऱ्या बाजूला, मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ‘हिंदू अमेरिकन फाउंडेशन’ (HAF) या संस्थेने सुरक्षेबाबत विशेष सूचना जारी केल्या आहेत.

संस्थेने सोशल मीडिया मंच ‘एक्स’वर (X) पोस्ट करत लिहिले की, “कार्यक्रमादरम्यान सर्व उपस्थितांनी सतर्क राहावे, सभोवतालच्या परिस्थितीचे भान ठेवावे आणि शांतता राखावी. काही सक्रिय गट हिंदू-अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करत हा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यू यॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी आपल्या पदाची शपथ पाळत सर्व नागरिकांच्या आणि कार्यक्रमाला येणाऱ्या उपस्थितांच्या सुरक्षेची व हक्कांची हमी द्यावी, अशी आम्ही मागणी करतो.”

सरसंघचालकांच्या या परदेश दौऱ्यावरील कार्यक्रमामुळे अमेरिकेतील भारतीय समुदायात आणि राजकीय वर्तुळात दोन भिन्न मतप्रवाह निर्माण झाले असून आज होणाऱ्या या सोहळ्याकडे जगाचे लक्ष लागले आहे.