नवी दिल्ली : “संस्कृत ही केवळ भाषा नसून भारताच्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरेचा मूळ आधार आहे. संस्कृतचा प्रसार वाढल्यास इतर सर्व भारतीय भाषा समृद्ध होतील, त्यांच्यात परस्पर नाते निर्माण होईल आणि समाज भारताच्या प्राचीन विचारसरणीशी तसेच, संस्कृतीशी अधिक घट्ट जोडला जाईल,” असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत ‘संस्कृत भारती’च्या दिल्लीतील मुख्यालयाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना भागवत यांनी देशात संस्कृतच्या अधिक व्यापक प्रसाराची भूमिका मांडली. संस्कृत कोणत्याही इतर भाषेची जागा घेत नाही वा तिच्यावर वर्चस्व गाजवत नाही. भारतात संस्कृतचा प्रवाह कधी मंदावला, तर कधी जोमाने वाहू लागला; मात्र तो कधी थांबला नाही. आजही अनेक कुटुंबे आणि गावे आहेत, जिथे संस्कृतचा दैनंदिन व्यवहारात वापर होतो, असे भागवतांनी नमूद केले.

भारत ही एक परंपरा आहे, ज्यावर जीवनाचा प्रवाह अखंडपणे चालू राहतो. ही परंपरा संपूर्ण सृष्टीतील सजीव आणि निर्जीव घटकांचे पालनपोषण करते. जगाला या परंपरेची सातत्याने गरज भासत असते आणि ही गरज पूर्ण करणे हे स्वतःला भारतीय मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे, असेही भागवत म्हणाले.

देश समजण्यासाठी संस्कृत आवश्यक!

या कार्यक्रमात डॉ. भागवत यांनी ‘भारत’ या संकल्पनेचा व्यापक अर्थ विशद केला. भारताला केवळ भौगोलिक वा राजकीय-आर्थिक अस्तित्व नाही. भारताला जिवंत ठेवण्यासाठी आणि त्याची वाटचाल पुढे नेण्यासाठी केवळ देशाला जाणून घेणे पुरेसे नाही, तर त्याच्या समृद्ध ज्ञानसंपदेचेही सखोल आकलन असले पाहिजे. आणि हे सर्व साध्य करायचे असेल, तर संस्कृत भाषा समजून घेणेही अत्यावश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

संस्कृतच्या प्रसारासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असून ‘संस्कृत भारती’ला ही जबाबदारी घ्यावी लागेल. देशातील प्रत्येक व्यक्तीला संस्कृतमध्ये संवाद साधता आला पाहिजे इतके हे प्रसाराचे काम व्यापक झाले पाहिजे. – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक