Mohan Bhagwat Toronto Speech : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर असून विविध संस्थांच्या कार्यक्रमात ते सहभागी होत आहेत. २९ ऑगस्टच्या अमेरिकेतील न्यू यॉर्कच्या कार्यक्रमाची दिवसभर चर्चा झाल्यानंतर काल कॅनडातील टोरंटो येथे हिंदू विश्व बंधू – एम्ब्रेस द वर्ल्ड इन फ्रेंडशिप या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. आपल्या भाषणात भागवत यांनी भारताच्या जागतिक मदत आणि एकतेच्या अंगभूत संस्कृतीवर भर दिला. एएनआयने यासंदर्भातील व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत.
हिंदू जागृत झाला तर…
हिंदू विश्व बंधू – एम्ब्रेस द वर्ल्ड इन फ्रेंडशिप या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “जगात कुठूनही भारताकडे मदत मागितली गेली तरी भारताने कधीही नकार दिला नाही आणि न मागताही भारत मदतीचा हात पुढे करतो. ही आपली परंपरा आहे, भारताचा हाच डीएनए (DNA) आहे. म्हणूनच तुम्ही कदाचित ऐकलं असेल की, ‘जर हिंदू जागृत झाले, तर जग जागृत होईल”, असं ते म्हणाले.
भारतीय आध्यात्मिक वारसा मानवता आणि निसर्गात कशा प्रकारे एकात्मता वाढवतो, याकडे भागवत यांनी लक्ष वेधलं. “ते सजीव आणि निर्जीव दोन्हींना आपले मानतात. त्यांना विविधतेत एकता पाहण्याचं शिक्षण दिले गेलं आहे. म्हणूनच भारतात विविधतेमुळे एकतेला कधीही अडचण येत नाही; आपली परंपरा आपल्याला शिकवते की केवळ विविधतेतच एकता नाही, तर विविधता हे स्वतःच एकतेचे एक रूप आहे”, असं सरसंघचालकांनी स्पष्ट केले.
‘खरे ज्ञान बाह्य भेदांच्या पलीकडे आहे’: भागवत
आपल्या भाषणात भागवत यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना स्वीकारण्याचं आवाहन केले. त्यांनी यावर भर दिला की, खरं ज्ञान हे मानवतेची मूळ आध्यात्मिक एकता ओळखण्यासाठी बाह्य भेदांच्या पलीकडे पाहण्यात आहे. “जे लोक उदार मनाचे आणि ज्ञानी आहेत, ते वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण पृथ्वी हे एक कुटुंब आहे, या संकल्पनेचा स्वीकार करतात. भौतिक जगातील व्यक्ती शरीर, आकार आणि रंगाने भिन्न असू शकतात, परंतु सार रूपाने आपण सर्व एक आहोत. म्हणूनच इतरांची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याला हे ज्ञान मिळालं आहे, जे आपल्याला चिरंतन आनंद आणि कायमचं समाधान देतं”, असं ते म्हणाले.
भारत विश्वगुरू बनला
भागवत यांनी नमूद केलं की, “भारत हा विश्वगुरू बनला, ‘महाशक्ती’ नाही. त्या काळात कोणी भारताला महाशक्ती म्हणू शकलं असतं, पण भारत महाशक्ती नव्हता. त्याने जगाची सेवा केली. स्वतःच्या चारित्र्यामुळे तो विश्वगुरू बनला, महाशक्ती नाही. त्यामुळे भारताचा उदय म्हणजे अधिक संघटित आणि अधिक मुक्त मानवता होय”, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
“जेव्हा मी हिंदू म्हणतो, तेव्हा हिंदू या शब्दाची व्याख्या कोणत्याही विशिष्ट भाषेने, कोणत्याही विशिष्ट उपासनेने किंवा कोणत्याही विशिष्ट जीवनशैलीने करता येत नाही. हे सर्व पैलू तिथे आहेतच. या मानवामधील विविधता आहेत. हिंदू या सर्वांचा आदर करतात आणि स्वीकार करतात”, असं मोहन भागवत म्हणाले.
“जगात कुठेही, जर कोणाचा छळ झाला असेल, तर त्याला फक्त भारतातच आश्रय मिळाला. अनेक लोक बाहेरून आक्रमक म्हणून भारतात आले, तरीही ते त्यांच्या सर्व वैशिष्ट्यांसह तिथे आजही प्रगती करत आहेत. ते आता भारतीय नागरिक आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू तिथे अल्पसंख्येने आहेत… अनेक लोक आश्रयासाठी भारतात येतात…”, असं मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं.
