Mohan Bhagwat UK Visit RSS Event: अमेरिकेपाठोपाठ आता लंडनमध्ये देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला विरोध होऊ लागला आहे. आरएसएसच्या कार्यक्रमांवर ग्रेटर लंडन अथॉरिटी या शासकीय संस्थेने बहिष्कार टाकावा, अशी मागणी करणारे पत्र विविध संस्थांनी लंडनचे महापौर सादिक खान यांना लिहिले आहे. गेल्या आठवड्यात, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात पार पडलेल्या संघाच्या कार्यक्रमाला देखील विरोध झाला होता.

कार्यक्रमाला जागा न देण्याचे आवाहन

संघाच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृती अभियानाचा भाग म्हणून मोहन भागवत यांचा अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये दौरे आयोजित करण्यात आले आहेत. याच जनजागृती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भागवत ब्रिटनमधील भारतीय समुदायाला संबोधित करण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरएसएसच्या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून न देण्याचे आवाहन विविध संस्थांनी महापौर सादिक खान यांना पत्रातून केले आहे. युकेस्थित ‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार, या संस्थांनी आपल्या पत्रात संघाचा उल्लेख “युरोपीय फॅसिझमपासून प्रेरणा घेतलेला एक सत्तावादी आणि लष्करी गट” असा केला आहे.

पत्रात काय म्हटलंय?

भागवत यांचा दौरा हा “ब्रिटनमधील समर्थकांच्या मदतीने, उपलब्ध संपर्काच्या माध्यमातून प्रतिमा सुधारण्याच्या मोहिमेचा भाग” असल्याचे म्हटले आहे, असे वृत्तात पुढे नमूद करण्यात आले आहे. या पत्रावर ‘हिंदूज फॉर ह्युमन राइट्स’, ‘युके-इंडियन मुस्लिम काउन्सिल’, ‘इंडिया लेबर सॉलिडेरिटी’ आणि ‘साऊथ एशिया सॉलिडेरिटी ग्रुप’ यासारख्या इतर संघटनांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार, “भागवत यांच्या दौऱ्यामुळे युकेमधील आरएसएस संबंधित संघटनांना चिथावणीखोर भाषणं देण्याचं बळ मिळेल. भारतीय समुदायामध्ये अधिक ध्रुवीकरण होईल आणि देशातील संवेदनशील घटकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण होईल”, असेही पत्रात पुढे म्हटले आहे.

लेबर पार्टीच्या माजी नेत्याचाही आरोप

लेबर पार्टीचे माजी नेते जेरेमी कॉर्बिन यांनीही आरएसएसच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. “सुदूर-उजव्या विचारसरणीच्या हिंसेचा इतिहास असलेल्या, द्वेष पसरवणाऱ्या गटाच्या नेत्याचे आदरतिथ्य करू नये,” असे कॉर्बिन यांनी म्हटले आहे. तसेच, आरएसएस सत्तावादी आणि भेदभाव करणारी संस्था आहे, असाही आरोप कॉर्बिन यांनी केला.

कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदाराकडून कार्यक्रमाचे स्वागत

दरम्यान, भागवत यांच्या कार्यक्रमाचे ब्रिटनमधील खासदाराने स्वागत केले आहे. ब्रिटनचे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी, “सरसंघचालक मोहन भागवत यांचे विचार ऐकून त्यांना आनंद झाला”, असे म्हटले आहे. ब्लॅकमॅन यांनी एक्सवर याबाबत पोस्ट करुन आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, “मोहन भागवत २ सप्टेंबर रोजीच यूकेमध्ये दाखल झाले असून ते ७ सप्टेंबरपर्यंत ते या दौऱ्यावर असतील”, अशी माहिती आरएसएसचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी लंडनमध्ये एका पत्रकार परिषदेतून दिली आहे.