Rss chief mohan bhagwat usa tour in Controversy : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या १७ दिवसांच्या अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन दौऱ्याला सुरुवातीपासूनच वैचारिक विरोधाचा सामना करावा लागत आहे. संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय अनिवासी आणि त्यांच्या वंशजांच्या गटांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या दौऱ्यात न्यूयॉर्कमधील ‘युनिव्हर्सल वननेस’ (वैश्विक एकत्व) परिषदेला विशेष महत्त्व आहे. मात्र, २९ ऑगस्ट रोजी मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी जाहीरपणे विरोध केल्याने हा दौरा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
भागवत हे अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमधील भारतीय समुदाय, विविध सामाजिक संस्था तसेच आंतरधर्मीय संघटनांशी संवाद साधणार आहेत. विविध देशांतील भारतीय नागरिकांशी संपर्क वाढवणे, भारतीय सांस्कृतिक विचारांची मांडणी करणे आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश देणे हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, संघाच्या विचारसरणीवर भारतात आणि भारताबाहेर होत असलेल्या टीकेमुळे भागवत यांच्या कार्यक्रमांना विरोध सुरू झाला आहे.
आंतरधर्मीय संघटनांचाही विरोध
भागवत न्यूयॉर्कमध्ये दाखल झाल्यानंतर काही तासांतच ममदानी यांनी पत्रकार परिषद घेऊन भागवत यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला. संघाच्या कार्यक्रमावर शहर प्रशासनाकडून बंदी घालता येईल का, असा प्रश्न विचारण्यात आला असता, हा खासगी कार्यक्रम असल्याने शहराला तसे अधिकार आहेत की नाहीत, याची आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कार्यक्रमाला आपला पाठिंबा नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. ममदानी यांनी आपण न्यूयॉर्कचे पहिले भारतीय-अमेरिकन महापौर असल्याचा उल्लेख करताना भारताच्या बहुविध आणि धर्मनिरपेक्ष स्वरूपाचा संदर्भ दिला. भारताची ओळख विविधता, धर्मनिरपेक्षता आणि प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांवरील विश्वासाशी जोडलेली असल्याचे त्यांनी म्हटले.
एखाद्या विशिष्ट समूहाला वगळण्याच्या विचारावर आधारित चळवळीचा उदय होणे आपल्यासाठी त्रासदायक असल्याचे सांगत त्यांनी संघाच्या विचारसरणीला विरोध केला. ममदानी यांच्याबरोबरच अमेरिकेतील काही नागरी आणि आंतरधर्मीय संघटनांनीही भागवत यांच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. न्यूयॉर्क सिटी हॉलच्या बाहेर झालेल्या पत्रकार परिषदेत मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करण्यात आली. हिंदूज फॉर ह्युमन राइट्स, इंडियन अमेरिकन मुस्लीम कौन्सिल आणि इंटरफेथ सेंटर ऑफ न्यूयॉर्क यांसारख्या संघटनांचा त्यात समावेश आहे. या संघटनांच्या भूमिकेचा केंद्रबिंदू संघाची भारतातील सामाजिक आणि राजकीय भूमिका हा आहे. त्यांच्या मते, सरसंघचालकांना आंतरधर्मीय परिषदेत प्रमुख वक्ता म्हणून व्यासपीठ उपलब्ध करून देणे म्हणजे संघाच्या विचारसरणीला आंतरराष्ट्रीय स्तरावर वैधता देण्यासारखे आहे.
‘युनिव्हर्सल वननेस’ परिषद नेमकी काय आहे?
‘अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’ फोरमच्या पुढाकाराने ‘युनिव्हर्सल वननेस’ परिषद आयोजित करण्यात आली आहे. विविध संस्था आणि संघटनांचा या उपक्रमाला सहभाग असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. जगभरातील संघर्षांच्या पार्श्वभूमीवर आध्यात्मिकता, शांतता, सामाजिक संवाद आणि विविध समुदायांमधील सलोखा वाढवणे हा परिषदेचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. या परिषदेत अमेरिकेतील हिंदू समाजाबरोबरच नागरी नेते, सार्वजनिक संस्थांचे प्रतिनिधी, विविध धार्मिक आणि सामाजिक समुदायांचे नेते तसेच आंतरधर्मीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आयोजकांच्या दृष्टीने हा कार्यक्रम केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नसून विविध धर्म आणि समुदायांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे.
दौऱ्याचा केंद्रबिंदू ‘वसुधैव कुटुंबकम्’
संघाच्या मते, भागवत यांच्या विदेश दौऱ्याचा केंद्रबिंदू राजकारण नसून भारतीय सांस्कृतिक विचारांची जागतिक मांडणी हा आहे. कॅनडा आणि ब्रिटनमधील कार्यक्रमांमध्ये सामुदायिक सेवा, पर्यावरणपूरक जीवनशैली, नागरी सहभाग, कुटुंबव्यवस्था आणि शाश्वत विकास यांसारख्या विषयांवर संवाद साधला जाणार आहे. त्यासोबतच ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार मांडला जाणार आहे. संघाच्या शताब्दी वर्षात सरसंघचालकांकडून जगभरातील भारतीय समुदायाशी थेट संवाद साधण्याच्या प्रयत्नांचा हा भाग असल्याचे संघाकडून सांगण्यात येते. त्यामुळे या दौऱ्याला संघाच्या जागतिक संपर्क अभियानाच्या दृष्टीनेही महत्त्व दिले जात आहे.
‘युनिव्हर्सल वननेस’च्या माध्यमातून मांडण्यात येणाऱ्या विचारांना १८९३ मधील शिकागो येथील धर्मसंसदेच्या संदर्भाशी जोडले जात आहे. स्वामी विवेकानंदांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे विविध धर्मांच्या प्रतिनिधींसमोर भाषण करताना धार्मिक सहिष्णुता, स्वीकार आणि मानवतेतील एकात्मतेचा संदेश दिला होता. विविध श्रद्धा आणि धर्मांचे पालन करणाऱ्या समाजांमध्ये परस्पर सन्मान आणि सलोखा असावा, हा विवेकानंदांच्या विचारांचा महत्त्वाचा भाग होता. त्याच परंपरेतून ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न भागवत यांच्या दौऱ्यात केला जात असल्याचे संघाचे म्हणणे आहे.
विरोधाचे मूळ कशात?
सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या दौऱ्याभोवती निर्माण झालेला वाद हा केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित नाही. तो संघाच्या विचारसरणीच्या आंतरराष्ट्रीय स्वीकारार्हतेशी जोडला गेला आहे. भारतात संघाकडे सामाजिक, सांस्कृतिक संघटना म्हणून पाहणारा मोठा समर्थकवर्ग आहे. त्याचवेळी संघाच्या भूमिकेबाबत आणि अल्पसंख्याक, धर्मनिरपेक्षता व बहुसांस्कृतिकतेच्या प्रश्नांवर टीका करणारे गटही आहेत. अमेरिकेत या दोन भूमिकांचा संघर्ष भागवत यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने सार्वजनिकपणे समोर आला आहे.
समर्थकांच्या दृष्टीने हा भारतीय विचार आणि संस्कृती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे; तर विरोधकांच्या मते संघाच्या विचारसरणीबाबत असलेल्या त्यांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून भागवत यांना आंतरधर्मीय व्यासपीठ देणे योग्य नाही. न्यूयॉर्कनंतर भागवत यांचा दौरा कॅनडा आणि ब्रिटनमध्येही होणार आहे. तेथेही भारतीय समुदाय, विविध सामाजिक संस्था आणि इतर समुदायांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणारे कार्यक्रम नियोजित आहेत. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये सुरू झालेला वैचारिक वाद पुढील कार्यक्रमांमध्येही उमटतो का, याकडे लक्ष लागले आहे. भागवत यांच्या विदेश दौऱ्यामुळे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रतिमा समोर येत आहेत. संघाच्या दृष्टीने हा ‘वसुधैव कुटुंबकम्’, शांतता आणि आंतरधर्मीय संवादाचा संदेश जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. तर विरोधकांच्या दृष्टीने हा संघाच्या विचारसरणीच्या जागतिक प्रसाराचा प्रयत्न आहे. त्यामुळे भागवत यांच्या दौऱ्याभोवतीचा वाद हा केवळ एका कार्यक्रमाच्या विरोधापुरता न राहता संघाची जागतिक प्रतिमा आणि धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेभोवती सुरू झालेला वैचारिक संघर्ष म्हणून पाहिला जात आहे.
deveshkumar.gondane@expressindia.com
