दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत मरीन ड्राईव्ह इथल्या एका हॉटेलमध्ये २२ फेब्रुवारीला आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. सुसाईड नोट सापडल्याने ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले होते. सुसाईड नोटमध्ये दादरा नगर हवेलीचे प्रशासक यांचे नाव असल्याने या घटनेला वेगळेच वळण लागले होते. राज्यातील सत्ताधारी पक्षांनी खास करून शिवसेनेने या प्रकरणी भाजपवर सडकून टीका केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दादरा नगर हवेलीच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुक होत असून ३० ऑक्टोबरला मतदान होणार आहे, ८ ऑक्टोबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. असं असतांना दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे. एवढंच नाही तर या पोटनिवडणुकीसाठी कलाबेन या शिवसेनेच्या उमेदवार असतील असं शिवसेनकडून घोषितही करण्यात आलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही माहिती ट्विटर वरून दिली आहे.

या पोटनिवडणुकीत भाजपने ४४ वर्षीय स्थानिक तरुण चेहरा महेश गावित यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे भाजपने उमेदवार जाहीर करताच काही तासातच शिवसेनेने कलाबेन यांचे नाव जाहीर केले. काँग्रेसने अजून या ठिकाणी उमेदवार जाहीर केलेला नाही हे विशेष.

दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेच्या जागेसाठी पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना होणार आहे. दिवंगत अपक्ष खासदार मोहन डेलकर हे या जागेवरून तब्बल सात वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. आता त्यांच्या पत्नीला उमेदवारी देत शिवसेनेने या निवडणुकीत रंगत आणली आहे. तेव्हा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये नव्याने वाकयुद्ध रंगतांना बघायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohan delkars wife kalaben delkar shivsena candidate for dadra nagar haveli by election asj82
First published on: 07-10-2021 at 23:47 IST