गेल्या आठवडय़ात पेट्रोलच्या दरात आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर प्रत्येकी १.५० रुपये आणि ४५ पैशांची दरवाढ मागे घेणे शक्य नसल्याचे केंद्रीय पेट्रोलियममंत्री एम वीरप्पा मोईली यांनी सोमवारी स्पष्ट केले. नागरिकांवर अधिक भार पडू नये म्हणून अतिशय कमी दरवाढ केल्याचा दावा त्यांनी केला.
दरवाढ मागे घेण्याबाबत विचारले असता मोईली नाही म्हणाले. देशातील गरज भागवण्यासाठी एकूण तेलापैकी ७३.७५ टक्के तेल आयात करतो आणि त्यासाठी सात लाख कोटी रुपये खर्च करतो, मात्र एवढा पैसा आणायचा कोठून, असेही त्यांनी सांगितले. गेल्या साडेतीन महिन्यांनंतर पेट्रोलच्या, तर महिन्याभरात दुसऱ्यांदा डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. स्थानिक विक्री कर अथवा व्हॅट जोडल्यानंतर ग्राहकांवरच त्याचा भार पडणार आहे.