Mojtaba Khamenei Hiding: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका-इस्रायल २८ एप्रिल रोजीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. याच हल्ल्यात अनेक बड्या इराणी अधिकारी आणि खामेनी यांच्या घरातील अनेक जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला. इराणचे सध्याचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी हे देखील या दिवशी गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जाते. मोजतबा यांच्या तब्येतीची सद्यस्थिती आणि त्याचे सद्यठिकाण याबाबत वारंवार विविध माहिती समोर येत असते. ताज्या माहितीनुसार, मोजतबा खामेनी हत्येच्या भीतीने लपून बसले आहेत आणि कुरिअरच्या माध्यमातून ते संवाद साधत असल्याचे वृत्त ‘सीबीएस’ने दिले आहे.
मोजतबा यांच्यापर्यंत पोहोचणे झाले कठीण
‘सीबीएस’ या अमेरिकी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अत्यंत गोपनीय पद्धतीने मोजतबा खामेनी यांचा इराणी अधिकाऱ्यांबरोबर संवाद सुरु आहे. मोजतबा यांच्याशी थेट संवाद होत नसल्याने सध्या दोन्ही देशात सुरु असलेल्या वाटाघाटीत अडथळा येत असल्याचे वृत्त अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सीबीएसने दिले आहे. अंतिम करारावर निर्णय होण्यासाठी यामुळेच विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेकडून पाठविण्यात आलेला प्रस्ताव मोजतबा खामेनी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो आणि तिथून प्रतिक्रिया येण्यासाठी देखील विलंब होतो, असे या वृत्तात म्हटले आहे.
मोजतबा आहेत तरी कुठे?
मोजतबा खामेनी यांचे सद्यठिकाण आणि इराणी प्रशासन त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी वापरत असलेल्या यंत्रणेवर भाष्य करण्यास व्हाईट हाऊसने नकार दिला आहे. मोजतबा २८ फेब्रुवारीपासून गायब आहेत. अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर मोजतबा देखील गंबीर जखमी झाल्याचे सांगितले. मोजतबा यांच्या जिवंत असण्याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात. कधी त्यांच्यावर रशियात प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आल्याचे सांगितले जाते तर कधी ते कोमात असल्याचे वृत्त समोर येते, दरम्यान मोजतबा यांच्या सद्यस्थितीबाबत ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही.
नेत्यांना हत्येची भीती
प्रमुख इराणी नेत्यांना हत्येची भीती असल्याने त्यांच्याकडून अधिक प्रमाणात काळजी घेतली जात आहे. अनेक बडे अधिकारी वास्तव्यासाठी बंकरची मदत घेत आहेत. तर, अनेकजण सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहण्यास टाळत आहेत. मोजतबा खामेनी देखील सुरक्षेचे अधिक खबरदारी घेत असल्याची माहिती विविध वृत्तांमधून समोर येत आहे. सुरक्षित नेटवर्कच्या मदतीने कुरिअरच्या माध्यामातून त्यांच्याशी संवाद साधला जात असल्याची माहिती सीबीएसच्या वृत्तातून आली आहे. शांतता कराराच्या बाबतीत अमेरिकेबरोबर कोणत्या गोष्टींवर चर्चा करावी आणि कोणत्या करु नये याची माहिती मोजतबा यांनी सहकाऱ्यांना दिल्याचे सीबीएसच्या वृत्तात म्हटले आहे.
