Mojtaba Khamenei On US-Israel Iran War : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत शेकडो नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिका आणि इस्रायल हे इराणवर हल्ले करत आहेत, तर इराणही अमेरिका आणि इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. या युद्धामुळे आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत आहे.

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचा व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमधून येणाऱ्या कच्च्या तेलाच्या जहाजांना अडथळे निर्माण होत असल्याने जगभरातील तेल आणि इंधनाचा साठा विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने याचा जगातील अनेक देशांना फटका बसण्याची शक्यता आहे. असं असतानाच आता इराणने होर्मुझ सामुद्रधुनीबाबत पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे.

मोजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर आज त्यांनी पहिल्यांदा जाहीर संबोधित केलं. यावेळी मोजतबा खामेनी यांनी अमेरिका-इस्रायलला मोठा इशारा दिला. ‘इराणच्या शत्रूंवर दबाव आणण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहील’, असं इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी म्हटलं आहे. तसेच ‘आम्ही प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ’, असा इशाराही मोजतबा खामेनी यांनी अमेरिका आणि इस्रायलला दिला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

मोजतबा खामेनी यांनी काय म्हटलं?

“या प्रदेशातील सर्व अमेरिकन हवाई तळ तात्काळ बंद करावेत, आखाती राष्ट्रांवर हल्ले सुरूच राहतील आणि या युद्धात मृत्यू पावलेल्या आमच्या नागरिकांचा बदला घेतला जाईल. तसेच इराणच्या शत्रूंवर दबाव आणण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहील आणि शत्रूंकडून झालेल्या नुकसानाची तेहरान भरपाई घेईल, अन्यथा त्यांच्या मालमत्तेचं नुकसान करेल”, असं मोजतबा खामेनी यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत मोजतबा खामेनी?

अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागेवर त्यांचे सुपूत्र मोजतबा खामेनी यांची निवड करण्यात आली. गेली ३६ वर्षे अयातुल्ला खामेनी यांनी इराणवर राज्य केलं. आता त्यांचा मुलगा मोजतबा यांच्याकडे देशातील सर्वोच्च पद आलं आहे. इराणची शक्तिशाली धार्मिक संस्था ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’ने (तज्ज्ञांची परिषद) मोजतबा खामेनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

५६ वर्षीय मोजतबा खामेनी यांचा जन्म १९६९ मध्ये मशहद येथे झाला. १९७९ मध्ये इस्लामिक क्रांतीपूर्वी त्यांचे वडील सक्रिय होते, त्या काळात ते लहानाचे मोठे झाले. मोजतबा यांना उच्च दर्जाचे धार्मिक विद्वान मानले जात नाही. त्यांनी कधीही कोणतेही निर्वाचित पद भूषवलेले नाही आणि त्यांच्याकडे कोणतेही औपचारिक सरकारी पद नाही. असं असूनही पडद्यामागून त्यांचा मोठा प्रभाव असल्याचं मानलं जातं. विशेषतः शक्तिशाली ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) सोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत.