Mojtaba Khamenei health Update coma leg amputation claim: इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नुकतेच निवड झालेल्या मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक दावे विविध माध्यमं आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन केले जात आहेत. हवाई हल्ल्यात मोजतबा खामेनी यांनी एक पाय गमावला असून, ते कोमात असल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर मोजतबा यांच्या सोशल मीडियावरील खात्यावर देखील त्यांचा ‘एआय’निर्मीत फोटो वापरल्याचा दावा केला जात आहे.

मोजतबा खामेनी कोमात, एक पाय गमावला?

अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला त्याच हवाई हल्ल्यात मोजतबा खामेनी गंभीर जखमी झाल्याचा दावा केला जात आहे. ‘द सन’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मोजतबा यांनी या हल्ल्यात एक पाय गमावला असून, सध्या ते कोमात आहेत, असे म्हटले आहे. पण, इराणी अधिकारी आणि सरकारने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. मोजतबा सुरक्षित असून, सर्वोच्च नेत्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे इराणने म्हटले आहे.

विविध माध्यमांचा दावा

२८ फेब्रुवारीच्या हवाई हल्ल्यात मोजतबा यांनी एक पाय गमावला असल्याचा दावा विविध माध्यमं करत आहेत. त्यांच्यावर तेहरानमधील एका रुग्णालयात उपचार सुरु असल्याचेही सांगितले जात आहे. पण, याबाबत खात्रीलायक माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच, विविध माध्यमांनी मोजतबा कोमात असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचा दावा केला आहे. पण, हा दावा देखील अधिकृतपणे सिद्ध झालेला नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मोजतबा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. पण, इराणने मोजतबा सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

पहिल्याच संदेशात अमेरिका – इस्रायला इशारा

सर्वोच्च नेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोजतबा खामेनी यांनी पहिल्यांदाच संबोधन जारी करताना अमेरिका आणि इस्रायलला गंभीर इशारा दिला आहे. प्रत्येक मृत्यूचा बदला घेणार असल्याचा गंभीर इशारा मोजतबा यांनी दिला. इराणच्या सरकारी माध्यमांनी मोजतबा खामेनी यांचा संदेश वृत्तवाहिनीवर वाचून दाखवला.

Khamenei Address Photo used by iran television
मोजतबा खामेनी यांचा संदेश सांगताना इराणी वृत्तवाहिन्यांनी वापरलेला फोटो (फोटो – AFP)

सोशल मीडियावर एआय फोटो?

“सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इराणी माध्यमांनी प्रसिद्ध केलेला आणि त्यांच्या नव्या सोशल मीडिया खात्यावर वापरण्यात आलेला फोटो एआय निर्मित असल्याचे समोर आले आहे. गुगलच्या सिंथआयडीने याची पडताळणी केली असता त्यात वॉटरमार्क आढळतात, यामुळे फोटो तयार करण्यासाठी गुगल एआयचा वापर केल्याचे दिसून येते”, असे बीबीसीचे पत्रकार शायन सरदारिझादेह यांनी एक्स वर पोस्ट केले आहे.

“मोजतबा यांचा फोटो जुनाच असून, खूप वर्षापूर्वीचा असल्याचे दिसून येते. रिव्हर्स इमेजचा वापर करुन याची पडताळणी करता येते. फोटोच्या मागील बॅकराऊंडही एडिट केल्याचे आणि एआयचा वापर करुन काढून टाकण्यात आले आहे”, असे शायन सरदारिझादेह यांनी पोस्ट म्हटले आहे. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मोजतबा सार्वजनिक ठिकाणी अद्याप दिसून आलेले नाही, ते गंभीर जखमी आहेत किंवा मारले गेलेत”, असे मत नेटकऱ्यांनी नोंदवले आहे.

Mojtaba Khamenei X Handle
गुगल पडताळणीत फोटो एआयनिर्मित असल्याचे आढळले. (फोटो – x/@Rahbarenghelab_)

मोजतबा यांचा संदेश काय?

“या प्रदेशातील सर्व अमेरिकन हवाई तळ तात्काळ बंद करावेत, आखाती राष्ट्रांवर हल्ले सुरूच राहतील आणि या युद्धात मृत्यू पावलेल्या आमच्या नागरिकांचा बदला घेतला जाईल. तसेच इराणच्या शत्रूंवर दबाव आणण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहील आणि शत्रूंकडून झालेल्या नुकसानाची तेहरान भरपाई घेईल, अन्यथा त्यांच्या मालमत्तेचं नुकसान करेल”, असं मोजतबा खामेनी यांनी म्हटलं आहे. मोजतबा यांचा हा संदेश इराणी सरकारी माध्यमांनी वाचून दाखवला.