Mojtaba Khamenei Health Update : इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं वृत्त इस्रायली माध्यमांनी दिलं होतं. आता इराणच्या निम-शासकीय मेहर न्यूज एजन्सीने एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये खामेनी यांची प्रकृती उत्तम असल्याचं दिसून येतंय. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे, याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

खामेनी यांच्या आरोग्याविषयी आणि ते कुठे आहेत याबद्दल सुरू असलेल्या वाढत्या चर्चांना पूर्णविराम देण्याच्या उद्देशाने मेहरने हा व्हिडिओ पहिल्यांदाच प्रसिद्ध केला आहे. मेहर ही इराण सरकार पुरस्कृत आणि इस्लामिक डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनद्वारे चालवली जाणारी एक निम-शासकीय वृत्तसंस्था आहे. इस्रायली माध्यमांनी खामेनी यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीबाबत इराणच्या नेतृत्वामध्ये चिंता पसरली असल्याचा दावा केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे.

इस्रायलकडून खामेनींच्या प्रकृतीविषयी चिंता

शुक्रवारी, इस्रायली वाहिनी ‘चॅनेल १४’ ने इराणमधील सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं होतं की, खामेनी यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. यापूर्वी ‘द जेरुसलेम पोस्ट’ने ‘इराणवायर’ आणि इराणी अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या प्रशासनाच्या जवळच्या सूत्रांचा हवाला देत त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. ‘द जेरुसलेम पोस्ट’च्या एका सूत्राने तर असेही म्हटलं होतं की, “आम्हाला लवकरच त्यांच्या निधनाची बातमी ऐकायला मिळाली, तर आश्चर्य वाटणार नाही.”

मेहर न्यूजने हा व्हिडिओ जारी करणे म्हणजे या अफवांना खोडून काढण्याचा आणि सर्वोच्च नेत्यांच्या प्रकृतीबाबत जनतेला आश्वस्त करण्याचा इराणच्या सरकारी माध्यमांचा एक प्रयत्न असल्याचं दिसतं. परंतु, हा व्हिडिओ कधीचा आहे याची कोणतीही तारीख नमूद केलेली नाही, तसेच या व्हिडिओची वेळ किंवा परिस्थितीची स्वतंत्रपणे पडताळणी होऊ शकलेली नाही.

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत मोजतबा खामेनी यांच्या अनुपस्थितीमुळे इराणच्या राजकीय भविष्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत.