Mojtaba Khamenei Iran Israel War Revenge: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अजूनहू सुरूच असून याचा शेवट नक्की कधी होणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी दोन मध्यस्थ देशांद्वारे इराणला पाठवलेले अमेरिकेबरोबरचा तणाव कमी करण्याचे किंवा संभाव्य युद्धविरामाचे प्रस्ताव फेटाळले आहेत, अशी माहिती इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
या अधिकाऱ्याने असा दावा केला की, आपल्या पहिल्या परराष्ट्र धोरणासंबंधी सेशनमध्ये अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध सूड घेण्याबाबतची खामेनी यांची भूमिका अत्यंत कठोर आणि गंभीर स्वरुपाची होती. मात्र, खामेनी स्वत: या सेशनसाठी उपस्थित होते की नाही, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.
खामेनी यांचा सूड घेण्याचा निर्धार
इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर खामेनी यांनी आपल्या पहिल्याच जाहीर निवेदनात युद्धात ठार झालेल्यांचा सूड घेण्याचा निर्धार व्यक्त केला होता आणि इराण शत्रूंकडून याची नुकसानभरपाई वसूल करेल असेही ते म्हणाले होते. तसेच भरपाई करण्यास शत्रूने नकार दिला तर इराण त्यांच्या मालमत्तेतून ती वसूल करेल किंवा तेवढ्याच प्रमाणात त्यांना उद्ध्वस्त करेल, असे खामेनी म्हणाले होते.
“आत्तापर्यंत या सूडाचा काही मर्यादित भाग प्रत्यक्षात आला आहे, पण जोपर्यंत तो पूर्णपणे साध्य होत नाही, तोपर्यंत हे प्रकरण आमच्या प्राथमिकतेवरती असेल,” असेही ते म्हणाले.
तसेच ते म्हणाले की, इराण कधीही मघार घेणार नाही आणि पूर्ण शक्तीने प्रतिकार करत राहिल. तसेच फक्त अयातुल्ला अली खामेनी यांचाच नाही तर युद्धात जीव गमावलेल्या प्रत्येक नागरिकाचा सूड घेतला जाईल. “आम्ही हुतात्म्यांच्या हत्येचा सूड घेण्यास विसरणार नाही,” असे ते म्हणाले.
खामेनी यांच्यावर मॉस्को येथील रुग्णालयात उपचार?
गेल्या काही दिवसांपासून इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांना उपचारांसाठी रशिया येथे हलवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. २८ फेब्रुव्रारी रोजी अमेरिका-इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याचा दावा केला जात आहे.
कुवेतमधील वृत्तपत्र अल-जरिदाने दिलेल्या वृत्तानुसार, ५६ वर्षीय खामेनी यांना मॉस्कोला हलवण्यात आले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवर चर्चा करताना खामेनी यांना वैद्यकीय उपचारांची ऑफर दिली होती. त्यानंतर खामेनी यांना रशियात हलवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
पुतीन यांच्या फोन कॉलनंतर खामेनी यांना रशियन लष्कराच्या विमानाने गुरुवारी मॉस्को येथे आणण्यात आले, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, रशियाने मात्र या वृत्ताची पुष्टी करण्यास किंवा ते फेटाळून लावण्यास नकार दिला आहे. Tass या वृत्तसंस्थेशी बोलताना रशियन राष्ट्राध्यक्षांचे प्रसिद्धी सचिव दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, “आम्ही अशा वृत्तांवर कधीही भाष्य करत नाहीत.”
इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी मंगळवारी त्यांच्या सैन्याने रात्री केलेल्या एका हल्ल्यात इराणचे उच्च पदस्थ सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांना ठार केल्याचे म्हटले आहे. तसेच लष्कराने जनरल घोलाम रेझा सोलेमानी यांच्या मृत्यूबाबतही घोषणा केली आहे. मात्र अद्याप इराणने या घोषणेबाबत अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.
