Mojtaba Khamenei mediates Pakistan-Afghanistan conflict: गेल्या तीन आठवड्यांपासून अमेरिका आणि इस्रायलविरोधात इराणचे युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराण प्रचंड नुकसानीचा सामना करत आहे. या संघर्षात अडकले असताना इराणने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील युद्ध थांबविण्यासाठी मध्यस्थीची तयारी दर्शवली आहे. “मुस्लिम राष्ट्र म्हणून दोन्ही देशांनी संबंध सुधारावेत, यासाठी मध्यस्थी करण्यास तयार आहे”, असे इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांनी म्हटले आहे.
ईदच्यानिमित्ताने मोजताबा यांचा संदेश
रमजान ईद आणि पर्शियन नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांनी दिलेल्या संदेशात त्यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या युद्धचा उल्लेख केला आहे. “आम्ही दोघांना आमचे जवळचे समजतो. दोन्ही देशांत संघर्ष सुरु झाल्यापासून तो थांबविण्यासाठी इराण प्रयत्न करत आहे. पण, तेहरानमधून होणाऱ्या प्रयत्नांना दोन्ही देशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही”, असे मोजताबा खामेनी यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे.
दोन्ही देशांची जवळचे संबंध
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, इराणचे अफगाणिस्तानबरोबर जवळचे संबंध असून, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला तेहरानमध्ये चर्चेसाठी आमंत्रण दिले होते पण, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती आहे. दरम्यान, तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष निवळावा यासाठी इराण प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. मोजताबा यांनी देखील पहिल्यांदाच या संघर्षावर भाष्य केले आहे.
तालिबानसोबत व्यापारी संबंध
इराण तालिबानचा जवळचा व्यापारी देश आहे. त्यामुळे दोन्ही देशातील आर्थिक संबंध खूप जवळचे आणि महत्वाचे मानले जातात. उभय देशांमध्ये द्विपक्षीय चार बिलियन डॉलरचा व्यापर झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मुस्लिम देशांचे हित लक्षात घेता दोन्ही देशांनी युद्ध थांबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती इराणने केली आहे.
ईदच्या पार्श्वभूमीवर युद्धविराम
दरम्यान, दोन्ही देशांनी ईदच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसांसाठी युद्धविरामाची घोषणा केली आहे. गुरुवारी पहाटेपासून सोमवार मध्यरात्रीपर्यंत असे पाच दिवसांसाठी ही शस्त्रसंधी लागू असणार आहे. पवित्र रमजान महिना आणि ईदच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया, कतार आणि तुर्किये या इस्लामिक देशांच्या विनंतीनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने शस्त्रसंधीचा निर्णय घेतला.
