Mojtaba Khamenei Iran New Supreme Leader : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्तपणे हल्ला केल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. आता त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांची निवड केली गेली असल्याचं वृत्त इस्रायली माध्यमांच्या हवाल्याने वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. असेंब्ली ऑफ एक्स्पर्टसने याबाबत निर्णय घेतला आहे.

३६ वर्षे देशावर राज्य करणारे खामेनी २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात ठार झाले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी, जावई आणि नातही ठार झाली. खामेनी यांच्या पत्नी मन्सूरेह खोजस्तेह बाघेरजादेह यांचेही हल्ल्यात झालेल्या जखमांमुळे निधन झाले. खामेनी यांचा कोणताही नियुक्त उत्तराधिकारी नव्हता. इराणच्या अंतरिम नेतृत्व परिषदेने पुढील उत्तराधिकारी निवडेपर्यंत सर्वोच्च नेत्याची जबाबदारी अयातुल्ला अलिरेझा अराफी यांनी स्वीकारली आहे. ते मसूद पेझेश्कियानचे अध्यक्ष आहेत.

IRGC ने टाकला दबाव?

या वृत्तानुसार, ५६ वर्षीय मोजतबा यांची देशाची सूत्रे हाती घेण्यासाठी निवड करण्यात आली आहे. ते अली खामेनी यांचा दुसरा मुलगा असून दीर्घकाळापासून त्याचा संभाव्य उत्तराधिकारी म्हणून विचार केला जात होता. इराण इंटरनॅशनलने पुढे असा दावा केला आहे की, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने मोजतबा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी धर्मगुरूंच्या परिषदेवर मोठा दबाव टाकला होता.

मोजतबा यांची निवड वादग्रस्त ठरणार का?

इस्लामिक रिपब्लिकने नेहमीच घराणेशाहीच्या शासनावर टीका केली आहे. अशा परिस्थितीत पित्याकडून मुलाकडे सत्तेचे हस्तांतरण होणे, या तत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरेल.

इराणचे सर्वोच्च नेते पद

इराणच्या जटिल शिया धर्मसत्ताक पद्धतीत ‘सर्वोच्च नेता’ हा सत्तेच्या केंद्रस्थानी असतो आणि राज्याच्या सर्व बाबींवर त्याचा अंतिम निर्णय असतो. या पदाकडे सशस्त्र दले आणि शक्तिशाली रिव्होल्युशनरी गार्डचे सरसेनापतीपद देखील असते. रिव्होल्युशनरी गार्ड ही एक निमलष्करी संघटना असून अमेरिकेने २०१९ मध्ये तिला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. अली खामेनी यांच्या राजवटीत या गार्डचा इराणच्या राजकीय, लष्करी आणि आर्थिक क्षेत्रातील प्रभाव कमालीचा वाढला होता.

अहवालानुसार, मोजतबा यांचे रिव्होल्युशनरी गार्डशी जवळचे संबंध आहेत आणि पडद्यामागून ते लक्षणीय प्रभाव पाडत असल्याचे मानले जाते. त्यांनी सर्वोच्च नेत्याच्या कार्यालयाचे कामकाज व्यावहारिकदृष्ट्या सांभाळले असून, अनेक विश्लेषक त्यांना या व्यवस्थेतील एक महत्त्वाचा ‘पॉवर ब्रोकर’ मानतात. मोजतबा हे मध्यम श्रेणीतील धर्मगुरू असून त्यांनी इराण-इराक युद्धादरम्यान इराणच्या सशस्त्र दलात सेवा बजावली आहे.