Who is Mojtaba Khamenei Iran Successor News : अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या जागेवर त्यांचे सुपूत्र मोजतबा खामेनी यांची निवड करण्यात आली आहे. आज आंतरराष्ट्रीय माध्यमांनी त्यांच्या निवडीचे वृत्त दिलं. गेली ३६ वर्षे खामेनी यांनी इराणवर राज्य केलं. आता त्यांचा मुलगा मोजतबा यांच्याकडे देशातील सर्वोच्च पद येणार आहे.

इराणच्या जटिल शिया धर्मसत्ताक पद्धतीत ‘सर्वोच्च नेता’ हा सत्तेच्या केंद्रस्थानी असतो आणि राज्याच्या सर्व बाबींवर त्याचा अंतिम निर्णय असतो. या पदाकडे सशस्त्र दले आणि शक्तिशाली रिव्होल्युशनरी गार्डचे सरसेनापतीपद देखील असते. रिव्होल्युशनरी गार्ड ही एक निमलष्करी संघटना असून अमेरिकेने २०१९ मध्ये तिला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. अली खामेनी यांच्या राजवटीत या गार्डचा इराणच्या राजकीय, लष्करी आणि आर्थिक क्षेत्रातील प्रभाव कमालीचा वाढला होता.

दि न्यू यॉर्क टाइम्सने अंतर्गत चर्चेची माहिती असलेल्या तीन इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, इराणची शक्तिशाली धार्मिक संस्था ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’ची (तज्ज्ञांची परिषद) मंगळवारी उत्तराधिकारावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. यामध्ये मोजतबा खामेनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परंतु, अंतिम घोषणा झालेली नाही.

अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेले इराणविरोधातील युद्ध अद्याप संपुष्टात आलेले नाही. त्यामुळे संघर्षाच्या परिस्थितीदरम्यान त्यांचं नाव जाहीर करणंही त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचं काही धर्मगुरूंनी म्हटलं असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

मोजतबा खामेनी कोण आहेत?

५६ वर्षीय मोजतबा खामेनी यांचा जन्म १९६९ मध्ये मशहद येथे झाला. १९७९ मध्ये इस्लामिक क्रांतीपूर्वी त्यांचे वडील शाहच्या विरोधात सक्रिय होते त्या काळात ते लहानाचे मोठे झाले. मोजतबा यांना उच्च दर्जाचे धार्मिक विद्वान मानले जात नाही. त्यांनी कधीही कोणतेही निर्वाचित पद भूषवलेले नाही आणि त्यांच्याकडे कोणतेही औपचारिक सरकारी पद नाही. असे असूनही, पडद्यामागून त्यांचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. विशेषतः शक्तिशाली ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) सोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यांनी इराण-इराक युद्धादरम्यान लढा दिला होता आणि त्यानंतर ते वडिलांच्या कार्यालयातील काही विभागांचे व्यवस्थापन पाहू लागले. २०१९ मध्ये अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध लादले होते. कोणतेही औपचारिक पद नसतानाही ते सर्वोच्च नेत्याच्या वतीने अधिकृतपणे काम करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.

मोजतबा खामेनी यांची निवड ऐतिहासिक का?

इराणमध्ये वंशपरंपरेने सत्तेची चावी देणं उचित मानलं जात नाही. तिथे घराणेशाहीला थारा नसल्याचंही म्हटलं जातं. मात्र, मोजतबा यांच्या निवडीमुळे इराणच्या या प्रथेला ब्रेक लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोजतबा यांची नियुक्ती ऐतिहासि ठरणार आहे.

त्यांची निवड महत्त्वाची का आहे?

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील इराणचे तज्ज्ञ अली नसर यांनी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले की, मोजतबा यांची निवड हे संकेत देईल की “आता राजवटीतील कट्टर ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ गटाचे वर्चस्व वाढले आहे.” जनतेद्वारे निवडलेली ८८ सदस्यीय ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’ ही संस्था घटनात्मकदृष्ट्या सर्वोच्च नेत्याची नियुक्ती आणि देखरेख करण्यासाठी जबाबदार असते. इस्लामिक प्रजासत्ताकाच्या इतिहासात नवीन नेता निवडण्याची ही केवळ दुसरीच वेळ असेल.