Mojtaba Khamenei is in a severe medical condition : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी गेल्या काही दिवसांपासून अलिप्त आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयीही अनेक उलटसुलट चर्चा होत असताना आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रिटीश वृत्तसंस्था द टाईम्सच्या एका अहवालानुसार, इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी हे सध्या गंभीर आजारी असून त्यांच्यावर कोम (Qom) येथे उपचार सुरू आहेत. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण हवाई हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते, ज्यात त्यांचे वडील आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता.

मोजताबा नाममात्र प्रमुख?

गुप्तचर अहवालानुसार मोजताबा खामेनी हे बेशुद्धावस्थेत असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ते सध्या राज्यकारभाराचे निर्णय घेण्यास असमर्थ असल्याचेही या वृत्तात म्हटलं आहे. तर, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) इराणच्या सरकारवर प्रत्यक्ष ताबा मिळवल्याचे वृत्त आहे. मोजताबा केवळ नाममात्र प्रमुख असून खरे अधिकार लष्कराकडे गेल्याचे बोलले जात आहे.

मोजताबा बेशुद्धावस्थेत?

आखाती मित्र राष्ट्रांमध्ये प्रसारित करण्यात आलेल्या एका राजनैतिक मेमोमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दिवंगत नेते अली खामेनी यांचे पुत्र खामेनी बेशुद्ध असून त्यांच्यावर एका गंभीर वैद्यकीय स्थितीवर उपचार सुरू आहेत. ‘द टाइम्स’च्या हाती हा मेमो आला असून यामध्ये त्यांच्या ठिकाणाची माहिती प्रथमच उघड करण्यात आली आहे. तेहरानच्या दक्षिणेला सुमारे ८७ मैल अंतरावर असलेले कोम हे शिया इस्लाममधील एक प्रमुख धार्मिक केंद्र मानले जाते. तिथेच मोजताबा खामेनी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सामूहिक दफनविधीसाठी प्रयत्न

मेमोमध्ये असे म्हटले आहे की, “मोजताबा खामेनी यांच्यावर कोममध्ये गंभीर अवस्थेत उपचार सुरू असून, ते शासनाच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत”. यामध्ये असेही सूचित केले आहे की, अली खामेनी यांच्या दफनासाठी कोममध्ये तयारी सुरू असून, एका मोठ्या समाधीस्थळाची पायाभरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “एकापेक्षा जास्त कबरी” या उल्लेखामुळे, कुटुंबातील इतर सदस्य आणि मोजताबा यांनाही त्या ठिकाणी दफन केले जाऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचर संस्थांना मोजताबा खामेनी यांच्या ठिकाणाची माहिती काही काळापासून होती असे मानले जात असले तरी, ही माहिती यापूर्वी सार्वजनिकरित्या उघड करण्यात आली नव्हती.

‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या दाव्यानुसार, युद्धाच्या सुरुवातीला झालेल्या एका हवाई हल्ल्यात मोजताबा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. याच हल्ल्यात त्यांचे वडील अली खामेनी, आई, पत्नी आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता. मार्चच्या सुरुवातीला उत्तराधिकारी म्हणून नाव जाहीर झाल्यापासून मोजताबा सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत. त्यांच्या संदर्भात केवळ काही लेखी विधाने प्रसिद्ध झाली आहेत, परंतु कोणताही ऑडिओ किंवा व्हिडिओ समोर आलेला नाही.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूर पेझेश्कियान यांनाही सर्वोच्च नेत्याला भेटण्यापासून रोखण्यात आले आहे. तसेच राष्ट्राध्यक्षांचे अनेक निर्णय IRGC कडून रद्द केले जात असल्याचे समजते. इराण सरकारने मात्र या सर्व दाव्यांचे खंडन केले असून सर्वोच्च नेते पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे.