Mojtaba Khamenei news update : इराणविरोधातील कारवाई अमेरिकेने वाढवली असून आता जमिनीवरून लढाई सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, या हल्ल्यात आतापर्यंत इराणच्या अनेक उच्च पदावरील नेत्यांचा मृत्यू झालेला असताना नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी हेसुद्धा मारले गेल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेच्या या दाव्यानंतर मोजताबा खामेनी यांचा नवा संदेश समोर आलाय.

‘आक्रमणाचा सामना’ करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल इराकी जनता आणि तेथील धार्मिक नेतृत्वाचे मोजताबा खामेनी यांनी शनिवारी आभार मानले असल्याचे वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी रविवारी दिले. मात्र नेमक्या कोणत्या माध्यमातून आभार मानले, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती होऊन तीन आठवड्यांहून अधिक काळ लोटला असला तरी, खामेनी अजूनही सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत किंवा त्यांचा आवाजही ऐकू आलेला नाही. युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात त्यांचे वडील अयातुल्ला अली खामेनी, त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला होता, तर मोजताबा खामेनी जखमी झाले होते. तेव्हापासून ते बेपत्ता आहेत.

खामेनी यांच्या नावाने जारी करण्यात आलेली काही लेखी निवेदने सरकारी माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांच्या जखमांच्या तीव्रतेबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, “नवे सर्वोच्च नेते एकतर मृत आहेत किंवा त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, कारण कोणीही त्यांना पाहिलेले नाही.”

‘ते जिवंत आहेत की नाही, हे आम्हाला माहित नाही’

युद्धाच्या सुरुवातीला झालेल्या हवाई हल्ल्यात वडील अली खामेनी यांच्या निधनानंतर मोजताबा खामेनी यांना इराणचे सर्वोच्च नेते घोषित करण्यात आले. मात्र, तेव्हापासून ते एकदाही जाहीरपणे समोर आलेले नाहीत. तेव्हापासून त्यांच्या नावाने केवळ काही मोजकीच लेखी निवेदने प्रसिद्ध झाली आहेत, ज्यात ‘नवरोज’च्या शुभेच्छांचाही समावेश आहे. ही निवेदने इतरांनी वाचून दाखवली आहेत आणि त्यांचे कोणतेही अलीकडील अधिकृत फोटो किंवा व्हिडिओ समोर आलेले नाहीत.

त्यांच्या या अनुपस्थितीमुळे त्यांच्या प्रकृतीबाबत आणि ठावठिकाण्याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. इराणी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हवाई हल्ल्यात झालेल्या जखमांमधून ते सावरत आहेत. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच म्हटले आहे की, वॉशिंग्टनचा खामेनी यांच्याशी कोणताही थेट संपर्क झालेला नाही. ट्रम्प म्हणाले, “त्यांचे नेते मरण पावले आहेत. त्यांचे सर्वोच्च नेते आता सर्वोच्च राहिलेले नाहीत. ते मरण पावले आहेत. ते एकतर मरण पावले आहेत किंवा त्याची प्रकृती खूपच खालावली आहे, कारण त्यांच्याबद्दल कोणालाही काहीच माहिती मिळालेली नाही. मला वाटते ते म्हणत आहेत की, ‘मला या सगळ्यातून दूर ठेवा.’

१९७९ च्या क्रांतीनंतर रुहोलल्लाह खामेनी आणि त्यानंतर त्यांचे वडील अली खामेनी यांच्यानंतर मोजताबा खामेनी हे इराणचे तिसरे सर्वोच्च नेते आहेत.