Benjamin Netanyahu Iran War News : अमेरिका-इस्रायल यांची इराणविरोधातील लष्करी कारवाई अजूनही सुरूच असून यामुळे मध्यपूर्वेत संघर्ष पेटला आहे. यादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांना इशारा दिली आहे. खामेनी यांच्यासाठी कुठलाही ‘लाईफ इन्शुरन्स’ नाही, असे नेतान्याहू म्हणाले आहेत.

अमेरिका-इस्रायल यांची इराणविरोधातील लष्करी कारवाई ही चांगल्या प्रकारे प्रगती करत आहे, असे नेतान्याहू गुरूवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच असोशिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलशी शत्रुत्व असलेल्या गटांच्या नेत्यांना लक्ष्य केले जाऊ शकते, असे संकेतही नेतान्याहू यांनी यावेळी दिले. इस्रायलने अमेरिकेबरोबर मिळून २८ फेब्रुवारी रोजी इराणविरोधात ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ सुरू केले आहे. या मोहिमेनंतर संपूर्ण मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

इस्रायल मोजतबा खामेनी किंवा हिजबुल्लाचे नेते नईम कासिम यांना लक्ष्य करणार का, असे विचारले असता, नेतन्याहू यांनी ही शक्यता नाकारता येणार नाही असे उत्तर दिले. “दहशतवादी संघटनांच्या कोणत्याही नेत्याच्या आयुष्याबाबत (Life Insurance Policy) मी कोणतीही शाश्वती किंवा हमी देणार नाही.” असे नेतान्याहू म्हणाले. यासंबंधीचे वृत्त एपीने दिले आहे. “आम्ही काय योजना आखत आहोत किंवा आम्ही काय करणार आहोत, याबद्दलचा नेमका रिपोर्ट येथे देण्याचा माझा कोणताही विचार नाही,” असेही पुढे बोलताना नेतान्याहू म्हणाले.

अमेरिका-इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर मोजतबा खामेनी हे इराणचे नवे सर्वोच्च नेते बनले आहेत.

इराणी लष्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर इस्रायल हल्ले करत असल्याचे नेतान्याहू यांनी सांगितले. “आम्ही रस्त्यांवर आणि चेकपॉईंट्सवर रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि बासिज या दोघांवरही जोरदार प्रहार करत आहोत आणि आम्ही अजूनही सक्रिय आहोत,” असे नेतान्याहू म्हणाले.

नेतान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलही विधान केले, यावेळी संघर्षादरम्यान ट्रम्प हे सातत्याने त्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही जवळजवळ दररोज बोलतो. आम्ही मोकळेपणाने बोलतो, कल्पना आणि सल्ल्यांची देवाणघेवाण करतो आणि एकत्रितपणे निर्णय घेतो,” असे नेतान्याहू म्हणाले.