अमेरिका-इराणमध्ये मागील काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराणमधील ‘इस्लामाबाद सामंजस्य करार’ही मोडल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता अमेरिका-इराण संघर्ष कधी संपेल? हा प्रश्न कायम आहे. यातच डोनाल्ड ट्रम्प हे इराणला धमकीवजा थेट युद्धाचा इशारा देणारे वक्तव्य करत असल्यामुळे तणावात भर पडत आहे.
या अमेरिका-इराण युद्धाचा फटका जागतिक व्यापाराला बसत आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांवर याचे गंभीर परिणाम होत आहेत. अमेरिका-इराण युद्धात सर्वाधिक नुकसान हे इराणचं झालं आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी एक महत्वाचं आवाहन केलं आहे. इस्लामिक राष्ट्रांना त्यांच्या ‘खऱ्या शत्रूला’ ओळखून त्याचा सामना करण्याचं आवाहन खामेनी यांनी एका पत्राद्वारे केलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
मोजतबा खामेनी काय म्हणाले?
मध्यपूर्वेतील युद्धाला सुरुवात होऊन ६ महिने उलटल्यानंतर मोजतबा खामेनी यांनी रविवारी इस्लामिक राष्ट्रांना अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध एकत्र येण्याचं आवाहन केलं. मोजतबा खामेनी म्हणाले की, “कोणतीही व्यक्ती, कोणत्याही पदावर असो, जर तिने जाणूनबुजून किंवा अजाणतेपणाने किंवा असं काही कृत्य केलं ज्यामुळे मुस्लिमांमध्ये फूट पडते किंवा मुस्लिमांमध्ये संघर्ष निर्माण होतो, तर त्या व्यक्तीने इस्लामच्या शत्रूंचं कार्य केलं असं समजावं. त्यामुळे तुम्ही तुमच्या खऱ्या शत्रूला ओळखा आणि त्याचा सामना करा”, असं आवाहन खामेनी यांनी अमेरिका आणि इस्रायलचा उल्लेख करत केलं.
And the blatant disrespect and derogatory remarks of the leaders of Global Arrogance directed toward certain leaders of Islamic countries are still fresh in your memory and ours.इराणने युद्धादरम्यान सौदी अरेबिया, यूएई, जॉर्डन, कुवेत, कतार, बहरीनसह मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे या राष्ट्रांबरोबर इराणचे संबंध बिघडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना मोजतबा खामेनी यांनी महत्वाचं आवाहन केलं आहे. मोजतबा खामेनी यांनी आणखी एका निवेदनात म्हटलं की, “या सेवकाचा इराणी जनतेला पुन्हा एकदा सल्ला आहे की त्यांनी आपापसात कोणत्याही प्रकारे मतभेद निर्माण होऊ देऊ नये आणि सामाजिक एकतेला बाधा आणणारं कोणतंही कृत्य करू नये.”
