Middle East Crisis : अमेरिका-इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिका-इराणमधील संघर्षात इराणचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह शेकडो इराणी नागरिकांना या युद्धात जीव गमवावा लागला आहे. या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतही मोठ्या प्रमाणात तणाव असल्याने जागतिक व्यापाराला अडथळे निर्माण होत आहेत आणि याचा फटका अनेक देशांना बसत आहे.
या सर्व घडामोडीनंतर आता इराणचे विद्यमान सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्यावर कर्ज न फेडल्यामुळे लंडनमधील घर विकण्याची वेळ आल्याच्या चर्चा सुरू आहेत. मोजतबा खामेनी यांच्याशी संबंधित असलेले लंडनमधील दोन लक्झरी फ्लॅट्स विक्रीला काढण्यात आल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांमध्येही बातम्या आल्या आहेत. यामध्ये एका ब्रिटिश राष्ट्रीय वृत्तपत्राचाही समावेश आहे. त्यामुळे इराणमध्ये खळबळ उडाली आहे. या चर्चांनंतर अखेर आता इराणकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.
मोजतबा खामेनी यांच्यावर कर्ज न फेडल्यामुळे लंडनमधील घर विकण्याची वेळ आल्याच्या चर्चांवर इराणच्या दूतावासाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. हे दावे पूर्णपणे निराधार असल्याचं सांगत त्यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. तसेच खामेनी यांची कुठेही कोणतीही मालमत्ता नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
इराणने काय स्पष्टीकरण दिलं?
“मोजतबा खामेनी यांच्याकडे त्यांच्या वडिलांप्रमाणेच इराणमध्ये किंवा देशाबाहेर कुठेही कोणतीही मालमत्ता नाही. त्यांची साधी आणि दिखाऊपणापासून दूर असलेली जीवनशैली इराणच्या जनतेला चांगली माहिती आहे. त्यामुळे खामेनी यांची लंडनमध्ये इस्रायली दूतावासाजवळ कोणतीही मालमत्ता नाही”, असं स्पष्टीकरण भारतातील इराणच्या दूतावासाने दिलं आहे.
“अशा प्रकारचे निराधार दावे त्यांच्या जीवनशैली आणि व्यक्तिमत्त्वाची चुकीची प्रतिमा निर्माण करण्याच्या उद्देशाने केले जात आहेत. इराणच्या जनतेच्या नजरेत अशा दाव्यांना अजिबात विश्वासार्हता नाही. त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे आणि त्यांच्याबद्दल असलेल्या प्रेम व आपुलकीमुळे इराणची जनता आजही त्यांच्या समर्थनार्थ सलग १९० दिवसांपासून रस्त्यावर उतरत आहे”, असं इराणच्या दूतावासाने म्हटलं आहे.
