Mojtaba Khamenei missing updates: मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील अंतर्गत सत्तासंघर्ष आणि नेतृत्वाबाबत जागतिक स्तरावर संभ्रम निर्माण झाला आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी ८ मार्च रोजी पदभार स्वीकारल्यापासून एकदाही सार्वजनिक दर्शन दिलेले नाही. त्यांच्या या गूढ अनुपस्थितीमुळे मोजतबा यांचा मृत्यू झाला असावा किंवा ते गंभीर जखमी असावेत, असा खळबळजनक दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी वारंवार केला आहे.
प्रमुख घडामोडींचा घटनाक्रम
इराणमधील या राजकीय अनिश्चिततेची सुरुवात २८ फेब्रुवारीच्या हल्ल्यापासून झाली. सायप्रसमधील इराणी राजदूतांच्या हवाल्याने ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या एका हल्ल्यात मोजतबा खामेनी गंभीर जखमी झाले होते, ज्यामध्ये त्यांच्या हातापायांना दुखापत झाली होती.
ईद-उल-फित्रच्या नमाजालाही अनुपस्थिती
यानंतर ८ मार्च रोजी त्यांनी सर्वोच्च नेतेपदाची सूत्रे अधिकृतपणे हाती घेतली, मात्र ते जनतेसमोर आले नाहीत. १२ मार्च रोजी त्यांनी राष्ट्राला उद्देशून पहिले भाषण केले, परंतु ते स्वतः पडद्यावर न दिसता एका निवेदकाने त्यांचा संदेश वाचून दाखवला. या संदेशात त्यांनी अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध सूड घेण्याची शपथ घेतली. त्यानंतर १८ मार्च रोजी त्यांनी लिखित संदेशाद्वारे अली लारीजानी आणि गुलामरेझा सोलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी दिली. सातत्यपूर्ण अनुपस्थितीचा हा घटनाक्रम पुढेही सुरूच राहिला. २० मार्च रोजी नवरोज निमित्त त्यांनी केवळ लिखित संदेश दिला, तर २१ मार्च रोजी तेहरानमधील महत्त्वाच्या ईद-उल-फित्रच्या नमाजालाही ते अनुपस्थित राहिले.
सार्वजनिक उपस्थितीचा अभाव आणि AI चा वापर
अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यकाळात ते नियमितपणे दूरदर्शनवर भाषणे देऊन जनतेशी संवाद साधत असत. मात्र, मोजतबा खामेनी यांनी सत्तेवर आल्यापासून केवळ सरकारी टीव्ही अँकर्समार्फत आपले संदेश पोहोचवले आहेत. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या दाव्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणी प्रशासनाने मोजतबा यांच्या ज्या प्रतिमा प्रसिद्ध केल्या आहेत, त्या एआय निर्मित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे इराणची खरी सत्ता आता इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) च्या हातात एकवटली असल्याची चर्चा जगभरात सुरू झाली आहे.
अमेरिका विरुद्ध इराण
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्या मते, इराणवरील हल्ल्यात मोजतबा यांचा चेहरा विद्रूप झाला असण्याची शक्यता आहे. याउलट, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले असून मोजतबा पूर्णपणे निरोगी असल्याचा आणि देशाचा कारभार समर्थपणे सांभाळत असल्याचा दावा केला आहे. संयुक्त राष्ट्रांमधील इराणच्या राजदूतांनी त्यांच्या अनुपस्थितीचे कारण ‘सुरक्षा’ असल्याचे सांगितले आहे.
