रॉयटर्स, दुबई

इराणच्या सर्वोच्च नेतेपदी आयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर कोण असेल, यावर धर्मगुरूंच्या मंडळात एकमत झाले आहे. या मंडळातील आयातुल्ला मोहंमदमेहदी मिर्बाकेरी यांनी ही माहिती दिली. खामेनी यांचा मुलगा मोजताबा खामेनी यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड केल्याची शक्यता असल्याचे धर्मगुरूंच्या मंडळातील एका सदस्याने सूचित केले.

इराणच्या सर्वोच्च नेतेपदाची निवड करणार्‍या धर्मगुरूंच्या मंडळातील वरिष्ठ सदस्याने सांगितले, की ‘अमेरिकेसारख्या सैतानानेही त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.’ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोजताबा खामेनी यांच्याशिवाय इराणला दुसरा पर्याय नसल्याचे विधान केले होते. त्यामुळे ही निवड केल्याचे अप्रत्यक्षरीत्या त्यांनी सूचित केल्याचे मानले जात आहे. मात्र, अद्याप काही प्रक्रिया बाकी असल्याचे मंडळातील सदस्यांनी सांगितले.

‘इराणने आपला पुढील सर्वोच्च नेता निवडला आहे,’ असे धर्मगुरूंच्या मंडळातील आयातुल्ला मोहसीन हैदरी अलेकासिर आणि अहमद अलामोल्होदा या दोन सदस्यांनी सांगितल्याचे वृत्त इराणमधील माध्यमांनी दिले आहे. या मंडळाच्या सचिवालयाचे प्रमुख आयातुल्ला हुसेनी बुशेरी हे धर्मगुरूंच्या मंडळाचा निर्णय सांगतील, असे अलामोल्होदा म्हणाले. हा निर्णय जाहीर करण्यासाठी सर्व मंडळाने एकत्र जमायचे, की प्रक्रियेतील हा भाग वगळून निर्णय जाहीर करायचा, हे अद्याप ठरायचे आहे, असे इराणमधील माध्यमांनी म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत अशी बैठक शक्य नसल्याचे मंडळातील बहुतेक सदस्यांचे मत आहे. खामेनी यांच्या मृत्यू वेळी मोजताबा खामेनी (वय ५६) तेहरानमध्ये नव्हते. आयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर सर्वोच्च नेता म्हणून मोजताबा यांच्याकडे पाहिले जाते.

धमक्यांपुढे झुकणार नाही- पेझेश्कियान

इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी रविवारीही सौम्य भाषा वापरून शेजारी देश मित्र आणि बंधू असल्याचे विधान केले. अमेरिका आणि इस्रायल इराण आणि शेजारी देशांमध्ये वितुष्ट आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. या धमक्यांपुढे आम्ही झुकणार नाही, असे ते म्हणाले. इराणच्या शरणागतीचे अमेरिकेने केवळ स्वप्नच पाहावे, असे ते म्हणाले.

यूएईवर इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला इराणने रविवारी १६ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ११७ ड्रोन्सचा मारा केल्याचे यूएईने म्हटले आहे. सर्व क्षेपणास्त्रे भेदण्याचे आल्याचे यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. इराणने बहारीनवरही हल्ले केल्याचे वृत्त आहे.

रशिया इराणला माहिती पुरवीत असल्याच्या वृत्ताचे खंडन

डोराल: ‘इराणला अमेरिकी तळांवर हल्ले करण्यासाठी रशिया माहिती पुरवीत असेल, तर त्याचा फार परिणाम होणार नाही,’ असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. रशिया इराणला माहिती पुरवीत असल्याच्या वृत्ताचे ट्रम्प यांनी खंडन केले. रशिया अशा प्रकारची माहिती देत असेल, तरी त्यांच्यापर्यंत ती पोहोचत नसेल. गेल्या आठवड्यात इराणमधील लक्ष्यांना ज्या प्रकारे भेदण्यात आले, त्यावरून त्यांना अशा माहितीची फार काही मदत होत नसेल, असे ट्रम्प म्हणाले.

तेहरानमधील तेलसाठे लक्ष्य

– इस्रायलने इराणमधील तेलसाठ्यांनाही लक्ष्य केले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी युद्धाच्या पुढील टप्प्यात अनेक आश्चर्ये पाहायला मिळतील, असा इशारा दिला आहे.

– ट्रम्प यांनी इराणला पूर्ण शरणागती पत्करण्याचे केलेले आवाहन इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी धुडकावून लावले आहे.

– लेबनॉनमधील इराणच्या पाठीराख्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी इस्रायलने लेबनॉनवर हल्ले केले आहेत. तेथे आणखी १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

– एकूण मृतांची संख्या ३०० हून अधिक झाली आहे. नेतान्याहू यांनी युद्धाचा पुढील टप्पा जाहीर करताना इराणचे सरकार उलथून टाकायचे असल्याचे सांगितले.