Mojtaba Khamenei India Representative: अमेरिका आणि इराण यांच्यात ४० दिवसांपासून सुरु असणाऱ्या युद्धात दोन आठवड्यांची शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इस्रायलने देखील यासाठी समर्थन दर्शवले आहे. शस्त्रसंधी झाली असली तर इराण अमेरिकेने माघार घेतल्याचा म्हणत हा आमचा विजय असल्याचा दावा करत आहे. पाकिस्तानकडून यासाठी मध्यस्थी करण्यात आल्याचा उल्लेख अमेरिका आणि इराणकडून करण्यात आला आहे. पण, इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनींचा या चर्चेत सहभाग होता का? त्यांची नेमकी काय भूमिका आहे? याबाबत खामेनी यांचे भारतातील प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी माहिती दिली आहे.

कुठे आहेत मोजताबा खामेनी?

मोजताबा खामेनी यांचे भारतातील प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत शस्त्रसंधी आणि खामेनी यांच्याबाबत भाष्य केले. मोजताबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत सुरु असणाऱ्या चर्चा फेटाळून लावत ते सर्व गोष्टींवर देखरेख ठेवत असल्याचे इलाही म्हणाले. जवळपास ४० दिवस झालेल्या या संघर्षात २००० जणांचा मृत्यू झाला. इराणने १० अटी अमेरिकेसमोर ठेवत शस्त्रसंधी मान्य केली. या बदल्यात त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास तयारी दर्शवली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेली गॅस आणि इंधन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

खामेनींच्या तब्येतीवर भाष्य

अ‍ॅक्सिऑसच्या अहवालानुसार, मोजताबा खामेनी यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अद्याप हजेरी लावलेली नाही. युद्धाच्या पहिल्याच दिवशी वडील आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर मोजताबा यांची सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली. अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तहेर खात्याने मोजताबा बेशुद्ध अवस्थेत असल्याचा दावा केला आहे. यामुळे त्यांचा प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत सहभाग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, इलाही यांनी मोजताबा यांची तब्येत उत्तम असल्याचे सांगताना त्यांचे सर्व घडामोडींवर लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

इराणचा विजय झाल्याचा दावा

४० दिवस चालेल्या या युद्धात इराणचा विजय झाल्याचेही डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही म्हणाले. इराणमधील अनेक वरिष्ठ नेत्यांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. दररोज होणारे हल्ले आणि दु:खाचे ओझे असताना, इराण डगमगला नाही आणि आक्रमक हल्ल्यांना प्रत्युत्त देत होता, असे इलाही म्हणाले. इराणने ठेवलेल्या अटी अमेरिकेने मान्य केल्याने त्यांचा पराभव झाला आहे. ट्रम्प यांनी शरणागती पत्करली, असेही इलाही यांनी नमूद केले. इराणमध्ये ना सत्ताबदल झाला त्याचा देशाचा नकाशा बदलला, अशा शब्दात त्यांनी ट्रम्प यांची खिल्ली उडवली.

होर्मुझचे महत्व

होर्मुझ सामुद्रधुनीबाबात बोलताना इलाही म्हणाले की, “आम्हाला सर्व देशांसोबत चांगले संबंध ठेवायचे आहेत. पण आम्हाला प्रमुख जलमार्गांवर नियंत्रण ठेवावे लागेल. शत्रूला त्याचा आमच्याविरोधात वापर करता येऊ नये”. “पाकिस्तानला आम्ही मध्यस्थी करण्यास सांगितले नव्हते. त्यांनीच प्रयत्न सुरु करुन दोन्ही देशांच्या नेत्यांशी संपर्क केला”, असे इलाही म्हणाले.