US Iran Ceasefire Mojtaba Khamenei Role: संपूर्ण इराणी संस्कृती नष्ट करण्याची धमकी देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली मुदत समाप्त होत असताना अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याच्या अटीवर अमेरिकेने दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य केल्याचे ट्रम्प म्हणाले. तर, इराणने देखील १० अटी अमेरिकेसमोर ठेवत युद्धविरामाला सकारात्मकता दर्शवली. पाकिस्तानने यासाठी मध्यस्थी केल्याचा उल्लेख दोन्ही देशांनी केला. या शस्त्रसंधीमुळे ४० दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष तात्पुरता थांबला आहे.
शस्त्रसंधीसाठी मोजताबा यांची महत्वाची भूमिका
अमेरिका आणि इराण यांच्या शस्त्रसंधीसाठी पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचे समोर आले असले तरी, इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांनी यासाठी महत्वाची भूमिका बजावली असल्याची माहिती आता समोर आली आहे. अयातुल्ला खामेनी यांचे पुत्र मोजताबा यांनी वाटाघाटी यशस्वी होण्यासाठी निर्णायक प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. अॅक्सिओसने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यास इराण तयार झाल्यानंतर अमेरिकेने दोन आठवड्यांसाठी हल्ले थांबविण्याचा निर्णय घेतला.
पडद्यामागे हालचाली
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची संस्कृतीची नष्ट करण्याची धमकी दिली होती. यावेळी पडद्यामागे अनेक हालचालींना वेग आला होता. अमेरिकी सैन्य वरिष्ठांकडून येणाऱ्या आदेशानुसार तयारी करत असताना अनेक घडामोडी घडत होत्या. सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये इस्टरची धामधूम होती त्यावेळी काही वरिष्ठ अधिकारी फोनवरुन महत्वाचे संभाषण करत होते, असे अॅक्सिओसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. इराणकडून प्राप्त झालेल्या १० अटी पाहून अधिकाऱ्यांनी प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त केला होता. दरम्यान, या संभाषणात पाकिस्तान, तुर्किये आणि इजिप्तही वाटाघाटी करण्यासह दोन्ही देशांत संवादाचा महत्वाचा दुवा म्हणून काम करत होते, असे अॅक्सिओसने म्हटले आहे.
मोजताबा यांच्याकडून सहमतीची प्रतीक्षा
शस्त्रसंधीबाबत निर्णय घेण्यासाठी इराणी नेते आणि अधिकारी सोमवार आणि मंगळवारी धावपळ करत होते. अमेरिकेचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव मोजताबा खामेनी यांच्यासमोर ठेवण्यात आला. अखेर मोजताबा यांनी महत्वाचा निर्णय घेऊन शस्त्रसंधीला ग्रीन सिग्नल दिल्याचे अॅक्सिओसने म्हटलंय. मोजताबा त्यांचे मत आणि भूमिकी चिठ्ठी अथवा नोटच्या माध्यमातून देत होते, असेही अॅक्सिओसने वृत्तात नमूद केले आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या सर्व मोठ्या वाटाघाटी मोजताबा यांच्याच माध्यमातून झाल्याचे वृत्तात स्पष्ट केले आहे. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला नसता तर कदाचित शस्त्रसंधी झालीच नसती, असे अॅक्सिओसने म्हटले आहे.
दोन्हीकडून प्रयत्न
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर देशांतर्गत इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या कमांडरना या युद्धविरामासाठी राजी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अमेरिकेकडून स्टीव्ह विटकॉफ मध्यस्थी करत होते. सुरुवातीला इराणने दिलेला १० कलमी प्रस्ताव स्टीव्ह विटकॉफ यांनी आपत्तीजनक असल्याचे म्हणत फेटाळून लावला होता. त्यानंतर पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्कीच्या मध्यस्थीने प्रस्तावात सुधारणा करण्यात आली, ज्याला अखेर मोजताबा खामेनी यांनी हिरवा कंदील दाखवला, असे वृत्त अॅक्सिओसने दिले आहे.
