Mojtaba khamenei Survived: अयातुल्ला ठार झाले त्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले त्यांचे पुत्र मोजतोबा खामेनीअमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. याच हल्ल्यात इराणमधील विविध वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. खामेनी यांच्या कुटुंबातील अनेकांचा यात मृत्यू झाला असला तरी त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी या हल्ल्यातून बचावले, असे वृत्त इराणी सूत्रांच्या हवाल्याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सने प्रसिद्ध केले आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर मोजतबा यांच्याकडे इराणची सूत्रे देण्याबाबत एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे.
अयातुल्ला यांचा मृत्यू
अमेरिका आणि इस्त्रायने शनिवारी इराणवर संयुक्त हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. याच हल्ल्यात अयातुल्ला यांच्या पत्नीसह इतर कुटुंबीयांचाही मृत्यू झाल्याची माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांमधून समोर आली. संरक्षित कंपाऊंडमध्ये अयातुल्ला यांच्यासोबत असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांचा यात मृत्यू झाला. दरम्यान, यावेळी अयातुल्ला यांचे पुत्र मोजतबा खामेनी देखील याचठिकाणी होते पण, ते हल्ल्यातून बचावल्याची माहिती आता समोर आली आहे.
पुत्र मजतोबा बचावले
५६ वर्षीय मोजतबा खामेनी यांच्याकडे वडील अयातुल्ला यांच्या मृत्यूनंतर सर्वोच्च नेतेपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. याबाबत इराणच्या वरिष्ठ पातळीवर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. मोजतबा बचावल्याची माहिती इराणी सूत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली आहे.
मोजतबा कोण आहेत?
मोजतबा खामेनी (५६) यांचा १९६९ मध्ये मशहद येथे जन्म झाला. मोजतबा यांचे शक्तिशाली ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) सोबत त्यांचे जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते. इराण-इराक युद्धादरम्यान त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली होती. त्यानंतर मोजतबा वडील अयातुल्ला यांच्या कार्यालयातील काही विभागांचे व्यवस्थापन पाहत होते.
