अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर आता अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील हे युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची चिन्हे आहेत. या संघर्षाचा परिणाम होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये होत असून याचा फटका जागतिक व्यापाराला बसत आहे. त्यामुळे अनेक देशांवर गंभीर परिणाम होत आहे. पण अशी परिस्थिती असतानाही अमेरिका-इराणमधील संघर्ष थांबत नाहीये.

आता अमेरिका-इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध पुन्हा लष्करी कारवाई करण्याच्या शक्यतेचे संकेत काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर आता इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी अमेरिका आणि इस्रायलला मोठा इशारा दिला आहे.

‘अमेरिका आणि इस्रायलने जर यापुढे कधीही आणि काही देशविरोधी लष्करी पाऊल उचललं, तर युद्धाची वेळ आणि अटी अमेरिका किंवा इस्रायल नाही तर इराण ठरवेल’, असा इशाराच मोजतबा खामेनी यांनी दिला. तसेच खामेनी यांनी इराणच्या सशस्त्र दलांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे आणि टार्गेट लिस्ट अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

मोजतबा खामेनी यांनी काय म्हटलं?

सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी इराणच्या सशस्त्र दलांना आदेश दिला आहे की शत्रूच्या कोणत्याही धोक्याला त्वरित आणि कोणत्याही भौगोलिक सीमांचं बंधन न पाळता प्रत्युत्तर द्यावं. त्यांच्या अधिकृत टेलिग्राम अकाउंटवर शनिवारी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. यामध्ये खामेनी यांनी म्हटलं की, “शत्रूंकडून होणारे कोणतेही नवीन लष्करी हल्ले कधी थांबवायचे याचा निर्णय इराण घेईल. कोणत्याही तीव्रतेच्या धोक्याला त्वरित प्रत्युत्तर दिलं जाईल. इराणचं सशस्त्र दल आणि इराणची जनता ठरवेल की पुन्हा सुरू झालेला संघर्ष कधी आणि कोणत्या अटींवर संपवायचा”, असा इशारा मोजतबा खामेनी यांनी दिला.

“आणखी दोन ठिकाणांचा बंदोबस्त करणार”, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

इराणमधील आणखी एक किंवा दोन लक्ष्यांचा बंदोबस्त करायचा आहे, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. खामेनी यांनी अमेरिका आणि इस्रायलला युद्धाचं नवं आव्हान दिलं होतं. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया दिली. शनिवारी फ्लोरिडा येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने इराणची लष्करी क्षमता आणि अणुकार्यक्रम लक्षणीयरीत्या कमकुवत केली, परंतु अद्याप काही लक्ष्यांवर कारवाई करणं बाकी आहे. ट्रम्प म्हणाले, “आम्ही त्यांची अणु यंत्रणा उद्ध्वस्त केली. मला वाटतं की आम्हाला अजूनही एक किंवा दोन ठिकाणांचा बंदोबस्त करावा लागेल, परंतु आम्ही ते १० मिनिटांत करू शकतो.”