जानेवारी २०२५ मध्ये जो कुंभमेळा पार पडला त्यावेळी मोनालिसा या रुद्राक्ष माळा विकणाऱ्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आले होते. दिसायला निरागस आणि तेवढीच सुंदर, निळ्या डोळ्यांची मोनालिसा ही तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर काही महिन्यांनी तिला चित्रपट मिळाल्याच्या बातम्या आल्यानेही ती चर्चेत आली. आता हीच मोनालिसा तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. सहा महिन्यांपासून तिचं फरमान नावाच्या मुसलमान तरुणावर प्रेम होतं. या दोघांनी हिंदू पद्धतीने केरळला जाऊन विवाह केला. ज्यानंतर आता तिच्या वडिलांनी फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.
माझ्या मुलीची फसवणूक करण्यात आली, मोनालिसाच्या वडिलांचा आरोप
माझ्या मुलीला फसवण्यात आलं आहे. मला वाटत नाही की हे खरोखरच लग्न आहे. माझी मुलगी मला सोडून कधी जायची नाही. पण तिला त्या लोकांनी (फरमानने) फुस लावली आणि माझ्यापासून तिला वेगळं केलं. माझी आणि माझ्या मुलीची फसवणूक करण्यात आली आहे, असं म्हणत मोनालिसा भोसलेचे वडील माध्यमांसमोर रडले. मला वाटलं की मुलीला चांगला चित्रपट मिळणार आहे. त्यासाठी मी तिच्याबरोबर केरळला गेलो होतो. मला त्यांनी तिथून पळवून लावलं आणि मी खूप रडलो. मी त्यांना सांगितलं मला दोन मिनिटं तिच्याशी बोलायलाही दिलं नाही. तिरुवनंतपुरमला मला घेऊन गेले होते. आम्ही दोघंही गेलो होतो. पण मला हे माहीत नव्हतं की मोनालिसाचं लग्न लावून दिलं जाणार आहे. मी पूर्ण रात्रभर झोपू शकलो नाही. मी खूप आशेने गेलो, मला वाटलं की तिला अभिनय शिकवला जाईल. चांगली स्टार होईल. मला हे माहीत नव्हतं की तिला फुस लावून काहीतरी खायला घालून त्यांच्या बाजूने करतील असं मोनालिसाच्या वडिलांनी म्हटलं आहे. मी पोलीस ठाण्यात होतो तेव्हाही मला काही सांगण्यात आलं नाही. मला फक्त एवढंच सांगण्यात आलं की मोनालिसाला आम्ही नाच आणि अभिनय शिकवण्यासाठी इथे ठेवून घेत आहोत. तिचं लग्न करणार हे मला माहीत नव्हतं. आमची फसवणूक झाली आहे असं मोनालिसाच्या वडिलांनी MP Tak या वृत्तवाहिनीला सांगितलं.
मोनालिसाचं म्हणणं काय?
मोनालिसा आणि तिचा पती फरमान या दोघांनी पत्रकार परिषद घेतली. मी माझ्या प्रियकराशी म्हणजेच फरमान खानशी माझ्या इच्छेने लग्न केलं आहे. आमचं हिंदू रिती रिवाजांप्रमाणे लग्न झालं आहे असं मोनालिसाने म्हटलं आहे. तसंच हा लव्ह जिहाद नाही असंही तिने म्हटलं आहे. माझ्या घरातले लोक आत्याच्या मुलाशी माझं लग्न लावून देणार होते. मला ते मान्य नव्हतं, त्यामुळे मी फरमानशी लग्न केलं असंही मोनालिसाने माध्यमांना सांगितलं. मात्र आता तिच्या वडिलांनी मोनालिसाची फसवणूक झाली आहे आणि मला या लग्नाबाबत कुठलीही कल्पना नव्हती असं म्हटलं आहे.

मोनालिसाच्या आजीने काय सांगितलं?
मोनालिसा उज्जैनमध्ये शिकत होती. तेव्हा तिला कुणीतरी सांगितलं की तू पुढे शिक्षण घे. नाच शिक, अभिनय शिक. त्यामुळे ती गेली. मोनालिसा माझ्या मुलाची मुलगी आहे. मोनालिसाला आणि माझ्या मुलाला त्याने (फरमान) शिकवलं. काल माझा मुलगा खूप रडत होता. कारण केरळमध्ये ते दोघं गेले पण माझ्या मुलाला ढकलून दिलं. पोलिसांनीही हेच सांगितलं की तू निघून जा असं प्रमिला भोसले यांनी सांगितलं.
