Monkeypox Case Confirmed In Kerala : काही दिवसांपूर्वीच हरियाणातील हिस्सार येथे २६ वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली होती. आता केरळमध्येही एका ३८ वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं पुढं आलं आहे. या व्यक्तीवर केरळच्या मलप्पुरममधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केरळच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मंकीपॉक्सची लागण झाल्याचं भारतातलं दुसरं प्रकरण आहे.
संबंधित व्यक्ती यूएईवरून केरळमध्ये दाखल
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ही व्यक्ती गेल्या आठवड्यात यूएईवरून केरळमध्ये दाखल झाली होती. पण तासांतच त्याला ताप आला. तसेच त्यांच्या शरीरावर चिकनपॉक्ससारख्या गाठी दिसून आल्या. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. यात संबंधित व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
हेही वाचा – जगभरात मंकीपॉक्सचा कहर! भारतात याचे किती रुग्ण? नेमका कसा पसरतोय हा आजार? जाणून घ्या लक्षणे अन् उपाय
केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती
यासंदर्भात बोलताना केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या, की मलप्पुरममधील एका ३८ वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनादेखील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. त्यांचीही चाचणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांचे अहवाल अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत.
नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
पुढे बोलताना, त्यांनी राज्यातील नागरिकांना काळजी घेण्याची आवाहनही केले आहे. नागरिकांना मंकीपॉक्सची कोणतीही लक्षणं आढळून आल्यास न घाबलता तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असं त्या म्हणाल्या. याशिवाय ज्या देशात मंकीपॉक्सची प्रकरणं आढळून आली आहेत, त्या देशातून येणाऱ्या विमानातील प्रवाशांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
मंकीपॉक्स म्हणजे नेमके काय?
मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून होणारा संसर्गजन्य आजार असला तरी प्राण्यांद्वारे माणसांमध्ये आणि एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होणारा आजार आहे. हा आजार प्रामुख्याने उष्ण कटिबंधातील वर्षावनांच्या (ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट) भागात म्हणजेच मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळतो. पश्चिम आणि मध्य आफ्रिकेमध्ये या आजाराचे दोन वेगवेगळे प्रकार आढळतात. खार, उंदीर, माकडाच्या विविध प्रजातींसह इतर प्राण्यांमध्ये या आजाराचे विषाणू आढळले आहेत.
मंकीपॉक्स लक्षणे काय आहेत?
मंकीपॉक्सबाधित रुग्णांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी आणि पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. ही लक्षणे सहसा जीवघेणी नसली तरी काही प्रकरणांमध्ये ते गंभीर असू शकते. लक्षणांमध्ये सुरुवातीला शरीरावर पुरळ उठण्यास सुरुवात होते. पुरळ उठण्याची सुरुवात चेहऱ्यापासून होते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरते. यामुळे जखमा होऊ शकतात. पू झाल्यानंतर जखम वाढून त्यात खड्डा पडतो.