देशाची आर्थिक आणि कृषी वाहिणी मानल्या जाणाऱ्या नैऋत्य मान्सून च्या आगमनाचा प्रवास यंदा चांगलाच रेंगाळला आहे. भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन अदांजानुसार मान्सूनसाठी आवश्यक असणारे पूर्व वार्याचा प्नवाह ५ ते ६ जूननंतरच सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे केरळमध्ये यंदा मान्सूनचे आगमन अत्यंत संथ किंवा सौम्य गतीने होईल आणि त्यानंतर तो हळूहळू जोर पकडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तारीख हुकली; आता ‘या’ दिवशी आगमनाची शक्यता
यंदा मान्सूनने हवामान विभागाला चांगलेच हुलकावणी दिली आहे. आयएमडीने सुरुवातीला २६ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र, हे वेळापत्रक चुकल्यामुळे आता २ ते ४ जून दरम्यान मान्सून अधिकृतपणे केरळमध्ये दाखल होऊ शकतो. सध्या केरळच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत, परंतु मान्सूनच्या अधिकृत घोषणेसाठी आवश्यक असणारे निकष अजूनही पूर्ण झालेले नाहीत.
मान्सून का रखडला?
हवामान विभागाच्या ‘ग्लोबल फोरकास्ट सिस्टीम’ या संगणकीय मॉडेलनुसार, सध्या उत्तर आणि पश्चिम भारतात सक्रिय असलेल्या ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ या हवामान प्रणालीमुळे मान्सूनचा मार्ग अडवला गेला आहे. हा प्रभाव कमी झाल्यानंतरच दक्षिण भारतात मान्सूनचे वारे मजबूत होतील.
अधिकृत मान्सून घोषणेचे ३ नियम
हवामान विभाग मान्सून आल्याचे तेव्हाच घोषित करतो, जेव्हा तीन अटी एकाच वेळी पूर्ण होतात –
१. केरळमधील ६०% हवामान केंद्रांवर सलग पाऊस होणे.
२. अरबी समुद्रात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग निश्चित मर्यादेपेक्षा जास्त असणे.
३. उपग्रहाद्वारे पुरेसे ढगांचे आच्छादन दिसणे.
सध्या केरळमध्ये पाऊस आणि ढगांची स्थिती अनुकूल आहे, परंतु अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग कमी पडत आहे. बंगालच्या उपसागरात नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनचे वारे कमकुवत झाले होते. मात्र, १ जून सोमवार पासून हे वारे पुन्हा वेग घेतील अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.
‘एल निनो’चा धोका : पावसाच्या अंदाजात कपात
यंदा केवळ मान्सूनच्या आगमनालाच उशीर होत नसून, एकूण पावसाच्या प्रमाणावरही संकट ओढवले आहे. पॅसिफिक महासागरात सक्रिय होत असलेल्या ‘एल निनो’ या हवामान स्थितीमुळे यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

सुरुवातीला आयएमडीने देशात ९२% पावसाचा अंदाज वर्तवला होता, परंतु गेल्या आठवड्यात त्यात आणखी कपात करून तो ९०% LPA – Long Period Average करण्यात आला आहे. यामुळे यंदा दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
सध्या उत्तर आणि मध्य भारताला तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामाच्या पेरण्यांसाठी शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. हवामान मॉडेलनुसार, सुरुवातीला मान्सूनची सुरुवात संथ असली, तरी आगामी काळात तो देशभरात कसा विस्तारतो यावरच देशाचे शेती भविष्य अवलंबून असेल.
