उन्हाच्या चटक्यानंतर शेतकऱ्यांची नजर आता आकाशाकडे लागली आहे. पावसाचा अंदाज घेत शेतात पुन्हा पेरणी/लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची तगमग सुरू झालेली दिसत आहे. मात्र, दरवर्षी सामान्यपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत होता. अखेर गुरुवारी (८ जून) मान्सून केरळात दाखल झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण दिसत आहे. दरम्यान, यावर्षी मान्सूनला केरळात दाखल व्हायला ७ दिवस उशीर झाला आहे.
४८ तासात केरळच्या सर्व भागांमध्ये मान्सूनची हजेरी लागणार
केरळनंतर आता मान्सून तामिळनाडू, कर्नाटक आणि इतर भागात जाईल. पुढील ४८ तासात केरळच्या सर्व भागांमध्ये मान्सूनची हजेरी लागणार आहे. चक्रीवादळ गेलं की, मान्सून पूर्ण तीव्रतेने देशाच्या इतर भागात वाटचाल करेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.
यंदा बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनवर परिणाम झाला आहे. सुरुवातीच्या काळात मान्सून कमी तीव्रतेचा असेल, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. मान्सूनच्या आगमनानंतर पहिल्या आठवड्यातील प्रवासावरून त्याच्या देशातील पुढील वाटचालीचा अंदाज बांधता येणार आहे.
लवकरच मान्सून महाराष्ट्रात होणार
दरम्यान, आधी भारतीय हवामान खात्याने ९ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र, केरळमध्ये दाखल व्हायलाच ८ जूनचा दिवस उजाडल्याने आता महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवेश पुढे ढकलला आहे. असं असलं तरी पुढील ३-४ दिवसात मान्सून राज्यात दाखल होऊ शकतो.
हेही वाचा : अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती; महाराष्ट्रालाही बसणार फटका!
गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात चक्रीवादळाच्या अनेक चर्चा होत्या. तरीही वाऱ्यांची स्थिती आणि वेग पाहता किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच भागामध्ये येत्या २४ तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता पुढील ४८ तासांमध्ये वाढू शकते. त्यामुळे किनारपट्टीवर आर्द्रता वाढून कोकण विभागात आठवड्याच्या अखेरीस पाऊस पडू शकेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामानाचे दोन वेगवेगळे मॉडेल वेगवेगळी स्थिती दर्शवत असल्याने मान्सूनच्या आगमनाबाबतचा अचूक अंदाज वर्तवता आला नाही, असंही सांगण्यात येत आहे.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon arrives in kerala seven days late know when will be in maharashtra pbs