पीटीआय, शिमला /गुवाहाटी /इटानगर/मंगळूरु

देशाच्या विविध भागांत मोसमी पाऊस सक्रिय झाला असून मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात भूस्खलन होऊन एकूण चौघांचा मृत्यू झाला, अशी माहिती दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांनी दिली. त्याबरोबरच ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील पूरस्थिती अजूनही गंभीर आहे.

कर्नाटकच्या मंगळूरुमधील नागोरी भागात बुधवारी पहाटे मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर तिघांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले. मूळचे बिहारचे असलेले हे कुटुंब गेल्या जवळपास २० वर्षांपासून येथे राहत होते. रात्रभर झालेल्या पावसामुळे टेकडीवरील मातीचा ढिगारा घरावर पडल्याने या कुटुंबातील सहा जण अडकले होते. स्थानिक नागरिक, अग्निशामक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी तातडीने बचावकार्य राबून तिघांची सुटका केली. मृतांमध्ये एक महिला आणि तिच्या दोन लहान मुलींचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे मंडी जिल्ह्यातील औट जवळ दरड कोसळून एका सुखबीर कौर या ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्या कुटुंबासह मणिकरण येथे जात असताना चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावर डोंगरावरून आलेला मोठा दगड अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. राज्यात अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून चंबा जिल्ह्यातील घरांचे नुकसान झाले आहे. उना जिल्ह्यातील स्वान नदी ओसंडून वाहत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे शिमला-मटौर महामार्गासह मंडी, कुलू, लाहौल-स्पीती आणि उना जिल्ह्यातील मुख्य रस्ते बंद झाले आहे.

अरुणाचल प्रदेशात आतापर्यंत चार बळी

अरुणाचल प्रदेशात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस, आकस्मिक पूर आणि भूस्खलनामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून २५१ गावांमधील सुमारे ९०,४९९ लोकांना याचा फटका बसला आहे. एनडीआरएफ, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), वायूदल आणि स्थानिक प्रशासन बचावकार्यात गुंतले आहे.

आसाममधील पूरस्थिती गंभीर

आसाममधील पूरस्थितीही गंभीर असून सहा जिल्ह्यांमध्ये ४६ हजारांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. धेमाजी जिल्ह्यातील सिसिबोरगाव येथे एका महिलेचा पुरात बुडून मृत्यू झाला असून ब्रह्मपुत्रा नदीसह आणखी एक नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. पुरामुळे राज्यातील ३,८०९ हेक्टरहून अधिक शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.