प्रेमविवाह केला म्हणून मुलीला जिवंत जाळलं; नणंदही भाजली

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये ऑनर किलिंग

मुरादाबादमध्ये विवाहितेला जिवंत जाळल्यानंतर परिसरात तणाव आहे.

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केला म्हणून मुलीला तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या घरात घुसून जिवंत जाळले. तिला वाचवण्यासाठी गेलेली नणंदही यात भाजली आहे.

मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने समाजात आपली बदनामी झाली अशा समजातून नाराज असलेल्या कुटुंबियांनी तिच्या सासरच्या घरात घुसून तिला मारहाण केली. त्यानंतर तिला जिवंत जाळले. तिला वाचवण्यासाठी आलेली नणंद यात गंभीर भाजली आहे. याआधीही कुटुंबियांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यावेळी तक्रार केली होती. पण पोलिसांनी सासरच्या मंडळींवरच गुन्हा दाखल केला होता, असा आरोप सासरच्या लोकांनी केला आहे.

मुरादाबादमधील जनपदमधील मुंढापांडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवला घाट या गावात राहणाऱ्या गुल्फशानं तीन वर्षांपूर्वी कुटुंबीयांचा विरोध झुगारून शेजारीच राहणाऱ्या साकिबशी विवाह केला होता. मुलीनं आंतरजातीय विवाह केल्यानं आपली समाजात बदनामी झाल्यानं तिचे कुटुंबीय नाराज होते. त्यात आज गुल्फशा आणि तिची नणंद या दोघीच घरात होत्या. त्याचवेळी तिच्या माहेरचे दहा ते बारा जण घरात घुसले आणि त्या दोघींना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गुल्फशाला जिवंत जाळले. तिच्या नणंदेने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तीही गंभीर भाजली. यावेळी तिच्या दोन वर्षांच्या मुलालाही जाळण्याचा प्रयत्न केला, पण नणंदेनं त्याला वाचवले. याबाबत तिच्या नणंदेनं सांगितलं की, घरची मंडळी एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. तर काही जण नमाज अदा करण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्याचवेळी गुल्फशाच्या माहेरची मंडळी घरात घुसली आणि त्यांनी तिला जिवंत जाळले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी एकाला अटक केली आहे. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. गुल्फशा आणि तिच्या सासरच्या लोकांवर दोन वर्षांपूर्वीही हल्ला केला होता. त्यावेळी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Moradabad honour killing woman sister in law burnt alive in uttar pradesh

ताज्या बातम्या