Donald Trump Iran Ship Statement: इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरुद्ध युद्ध पुकारून ११ दिवस होत आहेत. या युद्धामुळे संपूर्ण जगावर ऊर्जा संकट ओढवले असून भारतावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाचा शेवट जवळ आल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्यांनी अमेरिकन नौदलाचे कौतुक करताना असे विधान केले, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अमेरिकन पानबुडीच्या हल्ल्यात मागच्या आठवड्यात भारतात नौदल कवायतींसाठी आलेल्या इरिस देना जहाजावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर ट्रम्प यांचे विधान समोर आले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच अमेरिकन सैन्य दलाशी संवाद साधत असताना हे विधान केले. यावेळी त्यांनी इराणच्या ४६ जहाजांना नष्ट केल्याचा दावा केला. तसेच अमेरिकन नौदलाच्या कामगिरीचा दाखला देत असताना त्यांनी एका अधिकाऱ्याबरोबर झालेल्या संभाषणाची माहिती दिली.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मी अधिकाऱ्याला विचारले की, इराणचे जहाज बुडवण्यापेक्षा आपण ते ताब्यात घेतले असते तर आपल्याला वापरता आले नसते का? तर अधिकाऱ्यांनी उत्तर दिले की, त्यांना ते बुडवण्यात अधिक मजा येते. उलट जहाज बुडवणे हेच अधिक सुरक्षित आहे. ट्रम्प पुढे म्हणाले, मला वाटते त्यांचे म्हणणे खरे आहे.
या संभाषणातून अमेरिकन अधिकाऱ्यांची मानसिकता ट्रम्प यांनी सांगितली. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.
IRIS देनावरील ८७ जणांचा मृत्यू
भारतातील मिलान २०२६ या नौदल कवायतींसाठी इराणची युद्धनौका भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आले होते. या कवायती आटोपून IRIS देना ही युद्धनौका पुन्हा इराणच्या मार्गावर असताना श्रीलंकेजवळी समुद्रात त्यावर हल्ला करण्यात आला. युद्धनौकेवर तब्बल १२० लोक असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी ८७ नौसैनिकांचा मृत्यू झाला.
ऑपरेशन एपिक फ्युरी यशस्वी?
अमेरिकन सैन्याला संबोधित करत असताना राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात आखलेले ऑपरेशन फ्युरी यशस्वी झाल्याचा दावा केला. इराणच्या लष्करी व्यवस्थेला आपण हादरवून टाकल्याचे ते म्हणाले.
“आपण इस्रायलच्या सहकाऱ्याने तांत्रिक कौशल्य आणि लष्करी शक्तीचे जोरदार प्रदर्शन करत शत्रूला चिरडून टाकले आहे. इराणची ड्रोन आणि क्षेपणास्त्र व्यवस्था पूर्णपणे नेस्तनाबूत झाली आहे. इराणच्या नौदललाही जबर धक्का बसला आहे. आपण त्यांचे ४६ जहाज उध्वस्त केले. कुणी विश्वास ठेवू शकते का?”, असे सांगून ट्रम्प यांनी सैन्यदलाचे कौतुक केले.
