रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धावर तीन आठवडे झाल्यानंतरही अद्याप तोडगा निघालेला नाही. एकीकडे रशिया युद्ध पुकारल्यानंतर माघार घेण्यास नकार देत असताना दुसरीकडे युक्रेनही गुडघे टेकण्यास तयार नाही. रशिया ज्या निर्दयतेने मारिओपोलला वेढा घालून हे युद्ध लढत आहे, त्याची इतिहासात ‘युद्ध गुन्हे’ म्हणून नोंद होईल, असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
दरम्यान झेलेन्स्की यांची हत्या करण्यासाठी रशियाकडून आमखी एक टीम रविवारी देशात दाखल झाली असल्याचा दावा संरक्षण मंत्रालयाने केला आहे. फक्त झेलेन्स्कीच नाही तर इतर अनेक मोठ्या राजकारण्यांनाही ही टीम टार्गेट करणार आहे.
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य गुप्तचर संचालनालयाने फेसबुक पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “पुतीन यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित असलेली दहशतवाद्यांची आणखी एक टीम आज देशात दाखल होत आहे. लष्करातील वरिष्ठ अधिकारी तसंच युक्रेनच्या राजकीय नेतृत्वाला दूर करणं हे त्यांचं मुख्य कार्य आहे”.
युक्रेनमधील महाविद्यालयावर बॉम्बहल्ला
युक्रेनमधील मारिओपोल शहरात ४०० जणांनी आश्रय घेतलेल्या एका कला महाविद्यालयावर रशियाच्या लष्कराने बॉम्बहल्ला केल्याचे युक्रेनी अधिकाऱ्यांनी सांगितले. या बॉम्बहल्ल्यात महाविद्यालयाची इमारत नष्ट झाली असून लोक ढिगाऱ्याखाली दबले आहेत, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ल्यात हानी किती झाली, याबाबत लगेच काही सांगण्यात आले नाही. नागरिकांनी आश्रय घेतलेल्या मारिओपोल शहरातील एका नाटय़गृहावर रशियन फौजांनी बुधवारीही बॉम्बवर्षांव केला होता. ‘हल्लेखोरांनी मारिओपोल या शांत शहराबाबत जे केले, तो दहशतवाद असून येती अनेक शतके त्याचे स्मरण होत राहील’, अ्से झेलेन्स्की यांनी देशाला उद्देशून केलेल्या रात्रीच्या व्हीडीओ भाषणात सांगितले.
अझोव्ह समुद्रातील महत्त्वाचे बंदर असलेले मारिओपोल हे किमान तीन आठवडे बॉम्बहल्ल्यांना तोंड देत असून, रशियाच्या युक्रेनविरुद्धच्या हल्ल्यात भयाचे प्रतीक बनले आहे. हे शहर वेढले गेल्यामुळे त्याला होणारा अन्न, पाणी आणि वीज यांचा पुरवठा तुटला आहे. हल्ल्यात किमान २३०० लोक ठार झाले असून, त्यापैकी काहींना सामुदायिक थडग्यांमध्ये पुरावे लागले.
रशियन फौजांनी या उद्ध्वस्त शहराला वेढले असून, गेल्या काही दिवसांत खोलवर धडक दिली आहे. जोरदार संघर्षांमुळे एक मोठा पोलाद कारखाना बंद पडला असून, स्थानिक अधिकाऱ्यांनी शनिवारी पाश्चिमात्य देशांना आणखी मदत पाठविण्याचे आवाहन केले.