इतर मार्गानी उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने देशातील महत्त्वाच्या फलाटांवर योजना

प्रवासी व मालभाडय़ाव्यतिरिक्त इतर मार्गानी उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने रेल्वे देशातील महत्त्वाच्या फलाटांवर २ हजारांहून अधिक एटीएम उभारण्याची जागा उपलब्ध करून देणार असून; रेल्वेगाडय़ा, रेल्वे फाटके आणि रेल्वे रुळांशेजारील जागेत जाहिराती करण्यासाठी या क्षेत्रातील बडय़ा कंपन्यांशी संपर्क साधत आहे. या मार्गानी वर्षांला सुमारे २ हजार कोटी रुपये मिळवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे त्यांच्या खात्यात प्रथमच भाडय़ाव्यतिरिक्त इतर मार्गानी (नॉन-फेअर) उत्पन्नाचे धोरण आखत असून त्या ट्रेन ब्रँडिंग, रेल रेडिओ योजना यांसारख्या महसूल मिळवणाऱ्या उपायांचा समावेश आहे. याशिवाय पुढील आठवडय़ाच्या सुरुवातीला देशभरातील महत्त्वाच्या स्थानकांवरील फलाटांवर सुमारे २४०० एटीएम बसवण्याची महायोजनाही आखण्यात आली आहे.

सध्या रेल्वे तिच्या एकूण महसुलाच्या ५ टक्क्यांहून कमी रक्कम भाडय़ाव्यतिरिक्त स्रोतांतून मिळवते. ठोस योजनांद्वारे त्यात भरीव वाढ करण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

प्रस्तावित एटीएम हे टोकाकडील फलाटांवर अथवा स्थानकाच्या परिसरातील महत्त्वाच्या जागांवर राहतील. यासाठी पारदर्शक ई-लिलाव प्रक्रियेतून १० वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी स्थानके उपलब्ध करून दिली जातील, असेही हा अधिकारी म्हणाला.

सध्या निश्चित करण्यात आलेल्या जागांव्यतिरिक्त, रेल्वे रुळांशेजारील जागा, ओव्हरब्रिजेस आणि रेल्वे फाटके यांसारख्या आजपर्यंत न वापरलेल्या जागांवरही जाहिरात करण्याची परवानगी देण्याची तरतूद या धोरणात आहे.