मॉर्निंग बुलेटीन : पाच महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींच्या मुलाखतीनंतर सुबोध भावेचं स्पष्टीकरण आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या

टॉप ५

वाचाळवीरांची भाजपमध्ये मोठी संख्या
‘‘राजकीय क्षेत्रातील लोकांची गुणवत्ता अद्यापही अपुरी आहे. त्यामुळेच पक्षाची अधिकृत भूमिका नसतानाही अनेकजण उठसूट मते मांडत असतात. भाजपमध्येही अशा वाचाळवीरांची संख्या मोठी आहे,’’ अशी स्पष्टोक्ती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. देशासाठी ‘निर्णायक टप्पा’ ठरतील अशा गेल्या पाच वर्षांतील ‘परिवर्तनशील’ बदलांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे लोकसभा निवडणुकांमध्ये ‘ब्रँड’ ठरले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
वाचा सविस्तर

भाजपाचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध, अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीआधी देशभरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, मात्र अद्याप भाजपाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आज भाजपा आपला जाहीरनामा प्रसिद्ध कऱणार आहे. जाहीरनाम्यातून भाजपा मोठ्या घोषणा जाहीर करु शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. पाच वर्षात मोदी सरकारने मिळवलेलं यश तसंच शेतकरी, व्यापारी, तरुण आणि रोजगारासंबंधी काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर 

एबीपी न्यूज-सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार एनडीए बहुमतापासून दूर दिसत आहे. Express Photo By Amit Mehra

काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे असे वारंवार सांगणे बरोबर नाही – उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत असलेल्या परिस्थितीवरुन चिंता व्यक्त करताना काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही असं मत व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदी यांचे म्हणणे असे की, ‘‘शेतकऱ्यांच्या सध्याच्या गरिबीस काँगेस पक्षच जबाबदार आहे. काँग्रेसला हटवा गरिबी आपोआपच दूर होईल.’’ मोदी यांचे म्हणणे योग्य आहे, पण काँग्रेस 2014 सालीच हटली आहे. आज काँगेस उरलीय कुठे? ‘‘काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर

गुढीपाडव्याला यंदा मुंबईत वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरवली आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ५ एप्रिल रोजी मुंबईतील आरटीओंमध्ये १,१४३ चारचाकी आणि दुचाकी तसेच अन्य वाहनांची नोंदणी झाली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याचे समोर आले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने आणि वाहन खरेदीवर अधिक भर दिला जातो. पाडव्याच्या आदल्या दिवशी अनेक जण दुचाकी, चारचाकी, तीनचाकीसह अन्य वाहने खरेदी करतात. मात्र या वेळी मुंबईकरांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
वाचा सविस्तर

उद्धवसाहेबांचा माझ्यावर विश्वास, राहुल गांधींच्या मुलाखतीनंतर सुबोध भावेचं स्पष्टीकरण

‘मी शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि मला त्याचा अभिमान आहे. उद्धवसाहेबांचा माझ्यावर विश्वास आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांची मुलाखत घेणे हा माझ्या कामाचा एक भाग आहे’, असं स्पष्टीकरण अभिनेता सुबोध भावे यांने फेसबुक पोस्टद्वारे दिलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील हडपसरच्या मगरपट्टा सिटी येथे तरुणांशी गेल्या आठवड्यात संवाद साधला.

यावेळी अभिनेता सुबोध भावेने राहुल गांधी यांची मुलखात घेतली होती. या मुलाखतीनंतर अनेक चर्चांना उधाण आल्यानं सुबोधनं आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. वाचा सविस्तर 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Morning bulletin read top 5 news of state national