Mossad Agent M role in Iran conflict and details of the Italy boat accident involving Israeli intelligence : इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादचे प्रमुख डेव्हिड बार्निया यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, २०२३ मध्ये इटलीमध्ये झालेल्या एका बोट अपघातात मोसादच्या एका एजंटचा मृत्यू झाला होता, या एजंटने इराणविरुद्धच्या मोहिमांमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. द टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, मोसादच्या गुप्त कारवायांबाबत अशा प्रकारे अधिकृतपणे पहिल्यांदाच माहिती समोर आली आहे.

या एजंटची ओळख फक्त ‘एम’ इतकीच सांगितले जाते. लेक मॅगिओर एका बोट बुडाल्याची दुर्घटना झाली होती, ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये ‘एम’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एजंटचा समावेश होता. अधिकृतपणे त्याची ओळख उघड करण्यात आलेली नसली तरी, इस्रायली प्रसारमाध्यमांनी यापूर्वी त्याचे नाव एरेझ शिमोनी असल्याचे म्हटले होते. हे नाव देखील धारण करण्यात आलेले नाव असावे असे मानले जाते.

स्मृतीदिन सोहळ्याच्या एका कार्यक्रमात बोलताना मोसादचे प्रमुख डेव्हिड बार्निया म्हणाले की, “आज मी मोसादच्या मृत्यूमुखी पडलेल्या सदस्यांचा आणि वर्षानुवर्ष इस्रायलच्या सुरक्षेसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करतो.”

“ऑपरेशन रोअरिंग लायनदरम्यान, इस्रायलच्या बाहेर मृत्यूमुखी पडलेल्या ‘मेम’ (Mem) या व्यक्तीबद्दल आणि त्याच्या कार्याबबद्दल माझ्या विचार आणि मनात अभिमान दाटून आला होता, असे मोसादचे प्रमुख पुढे बोलताना म्हणाले.

मेम यांच्या नेतृ्त्वाखालील मोहिमेत कल्पकता, चातुर्य आणि प्रगत तंत्रज्ञानाचे एकत्रिकरण होते आणि या मोहिमेचा इराणविरोधातील मोहिमेच्या यशामध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला,” असे बार्निया म्हणाले.

इटालियन प्रसारमाध्यमांनी यापूर्वी असे वृत्त दिले होते की, गुप्तचर विभागातील कर्मचारी एकत्र जमलेले असताना ही घटना घडली. दरम्यान बुडालेल्या बोटीतील बहुतांश जण हे इस्रायल आणि इटालीच्या गुप्तचर संस्थांशी संबंधित होते. इटलीच्या सेक्युरिटी सर्व्हिसने अपघातात मृत्युमुखी पडलेले दोन जण हे त्यांचे कर्मचारी असल्याची पुष्टी केली होती.

इस्रायलमध्ये स्मृतिदिन साजरा केला जात असताना हा खुलासा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे इराणच्या वरिष्ठ नेत्यांनी इराणबरोबर सध्या सुरू असलेला तणाव हा राष्ट्रीय सुरक्षेपुढील एका मोठ्या आव्हान असल्याचे यावेळी सांगितले.

“प्रत्येक पीढीमध्ये आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी लोक उभे राहतात, अगदी या पीढीमध्येही,” असे बिन्यामिन नेतान्याहू माउंट हेर्टझल येथे आयोजित समारंभात बोलताना म्हणाले.

इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कार्ट्झ यांनी यावेळी हेझबोलाला इशारा देखील दिला. ते म्हणाले की, सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे त्यांच्या नेतृत्वाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. यावेळी त्यांनी आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी इस्रायलची लष्करी मोहिम सुरूच ठेवली जाईल यावर देखील भर दिला.

या समारंभाला अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, ज्यामध्ये इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हेर्झोग आणि क्नेसेट स्पीकर अमीर ओहाना यांचाही समावेश होता. कर्तव्य बजावताना आणि संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आठवणीत देशभरात आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमांच्या निमित्ताने हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.