Mossad assassination plot Asim Munir: इस्रायलची गुप्तहेर संस्था ‘मोसाद’ने पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट रचला होता, असा खळबळजनक दावा ब्राझीलचे प्रसिद्ध पत्रकार पेपे एस्कोबार यांनी केला आहे. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार पार पडला. यासाठी मध्यस्थीची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानकडून पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर सहभागी झाले होते. यावेळी मुनीर यांच्यासह संपूर्ण शिष्टमंडळाची हत्या करण्याचा कट मोसादने रचला होता, असा दावा एस्कोबार यांनी केला आहे. पाकिस्तानने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.

मोसादने कट रचल्याचा दावा

गेल्या जवळपास चार महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असणाऱ्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी उभय देशांना चर्चेला प्राधान्य दिले आहे. याचाच भाग म्हणून अमेरिका आणि इराण यांच्यात स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे सामंजस्य करार पार पडला, या करारासाठी पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका बजावली आहे. दरम्यान, या ऐतिहासिक करारवेळी पाकिस्तानकडून पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर उपस्थित होते. अमेरिकेकडून उपराष्ट्रपती जे. डी. व्हॅन्स यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी मुनीर यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाच्या हत्येचा कट मोसादने रचल्याच्या दाव्याने खळबळ निर्माण झाली आहे.

मोसादचा कट आणि पाकिस्तानचा इशारा

राजकीय विश्लेषक मारियो नावफल यांच्या पॉडकास्टमध्ये बोलत असताना पेपे एस्कोबार यांनी विविध खुलासे केले. “इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांच्या आदेशावरून मोसादने असीम मुनीर आणि पाकिस्तानी शिष्टमंडळाच्या हत्येचा कट रचला होता. याची माहिती पाकिस्तानी लष्करी गुप्तचर संस्थेला मिळाली होती”, असा दावा पेपे एस्कोबार यांनी पॉडकास्टमध्ये बोलताना केला. कटाची माहिती मिळताच पाकिस्तानने इस्रायला स्पष्ट इशारा दिला होता, असाही दावा एस्कोबार यांनी केला आहे. “शिष्टमंडळाला हात लावला, तर तुम्हाला जगाच्या नकाशावरून पुसून टाकू”, असा इशारा पाकिस्तानने इस्रायला दिल्याचेही एस्कोबार म्हणाले. ओमानच्या माध्यमातून हा संदेश पाठवल्याचेही एस्कोबार यांनी सांगितले.

पाकिस्तानने फेटाळला दावा

पाकिस्तानी माध्यमं आणि पत्रकारांनी एस्कोबार यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार सय्यद तलत हुसेन यांनी याप्रकरणी एक्सवर पोस्टकरुन या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देतना हुसेन यांनी हा दावा म्हणजे विकृती असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी पाकिस्तान आणि इस्रायल यांच्यातील वैर जगजाहीर आहे. अलिकडेच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलवर टीका केली होती. यानंतर इस्रायलने पाकिस्तानच्या मध्यस्थी म्हणून भूमिकेवर आक्षेप घेतला होता. दरम्यान, एस्कोबार यांच्या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे.