Israel Operation Roaring Lion Iran War: अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणविरोधात युद्ध सुरु केले. अमेरिकेने या युद्धाला एपिक फ्युरी तर इस्रायलने या कारवाईला ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’ असे नाव दिले. इस्रायलच्या ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’च्या मागे असणारा प्रमुख एजंटचा मृत्यू झाल्याची माहिती प्रथमच मोसाद प्रमुखांनी दिली आहे. हा एजंट इराणविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या ऑपरेशनमध्ये महत्वाची भूमिका बजावत होता.
गुप्तहेर ‘एम’ यांचा मृत्यू
इस्रायलच्या शहीद दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात मोसाद प्रमुख डेव्हिड बार्निया यांनी गुप्तहेराच्या मृत्यूची माहिती दिली आहे. डेव्हिड बार्निया यांनी या गुप्तहेराचे नाव ‘एम’ (M) असल्याचे सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव या एजंटचे पूर्ण नाव जाहीर करण्यात आलेले नाही. समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, गुप्तहेर ‘एम’ अधिकारी निवृत्त झाला होता, परंतु देशाच्या सुरक्षेसाठी तो पुन्हा सेवेत रुजू झाला. एका महत्त्वाच्या मोहिमेवर असताना इस्रायलबाहेर त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.
ऑपरेशन रोअरिंग लायनमध्ये महत्त्वाची भूमिका
‘ऑपरेशन रोअरिंग लायन’बाबत मोसाद प्रमुख डेव्हिड बार्निया यांनी दिली. या ऑपरेशनमध्ये इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी हालचालींना मोठा धक्का दिला. गुप्तहेर ‘एम’ यांनी या ऑपरेशनची पायाभरणी करण्यात आणि ते यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे बार्निया यांनी सांगितले. ‘एम’ अतिशय चतूर, चलाख, कल्पक आणि प्रगत तंत्रज्ञानाची माहिती असणारा गुप्तहेर होता, असेही बार्निया यांनी सांगितले.
इटलीत मृत्यू झाल्याचा दावा
‘एम’ नावाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू मे २०२३ मध्ये इटलीतील लेक मॅगिओर येथे झालेल्या एका नौका दुर्घटनेत झाला असावा, असा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे. या दुर्घटनेत एक इस्रायली आणि दोन इटालियन गुप्तचर अधिकारी ठार झाले होते. दरम्यान, एम यांच्या मृत्यू कसा आणि कुठे झाला? याबाबत अधिकची माहिती समोर आलेली नाही. ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’ एक भाग म्हणून, इस्रायलने अलीकडेच अझरबैजान आणि इतर देशांमध्ये कथितपणे इराणशी निगडीत एका मोठ्या दहशतवादी जाळ्याचा पर्दाफाश केला होता. या जाळ्याचे मुख्य सूत्रधार आणि IRGC चे वरिष्ठ अधिकारी रहमान मोकदम हे यात मारले गेल्याचे सांगितले जाते.
