पीटीआय, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत या वेळी एकूण ८,३६० उमेदवार रिंगणात आहेत. अधिकृत आकडेवारीच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की १९९६ च्या लोकसभा निवडणुकीनंतर यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी २०१९ च्या निवडणुकीत ८,०३९ उमेदवार रिंगणात होते आणि १९९६ मध्ये विक्रमी १३,९५२ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. त्यापैकी मतदानाच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. सहाव्या आणि अंतिम टप्प्यात अनुक्रमे २५ मे आणि १ जून रोजी मतदान होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमधील ९६ संसदीय जागांसाठी मतदान झाले. या टप्प्यात सर्वाधिक १,७१७ उमेदवार रिंगणात होते. अधिकृत आकडेवारीनुसार, लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या १९५२ मध्ये १,८७४ वरून २०२४ मध्ये ८,३६० पर्यंत चार पटीने वाढली आहे.

निवडणूक लढविणाऱ्या एकूण उमेदवारांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. आकडेवारी दर्शवते की १९८९ मधील नवव्या सार्वत्रिक निवडणुकीत, ६,१६० उमेदवार रिंगणात होते, १९९१-९२ मध्ये, ८,६६८ उमेदवारांनी निवडणूक लढवली. १९९६ मध्ये लोकसभेच्या ५४३ जागांसाठी विक्रमी १३,९५२ उमेदवार रिंगणात होते. आयोगाने सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये ५०० रुपयांवरून १०,००० रुपयांपर्यंत वाढ केल्याने १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार कमी झाले. २००४ मध्ये, उमेदवारांच्या संख्येने पुन्हा ५,००० चा टप्पा ओलांडला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most candidates in the fray for the first time since 1996 8360 candidates in the lok sabha elections amy
First published on: 23-05-2024 at 05:05 IST