नवी दिल्ली : देशातील ३३ लाख मुले ही कुपोषित असून त्यातील निम्मी मुले अती कुपोषित गटात असून त्यांचे प्रमाण महाराष्ट्र, बिहार, गुजरात या राज्यांत अधिक आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्रालयाने  माहिती अधिकाराअंतर्गत उत्तरात दिली आहे.

देशातील सर्वाधिक कुपोषित मुले महाराष्ट्रात असून ही  संख्या ६.१६ लाख आहे. त्यात मध्यम   कुपोषित मुले १.५७ लाख,  तर जास्त कुपोषित मुलांची संख्या ४.७५ लाख आहे.

दुसऱ्या क्रमांकावर बिहार असून तेथे ४.७५ लाख कुपोषित मुले आहेत. त्यात  ३ लाख २३ हजार ७४१ मुले मध्यम कुपोषित तर १ लाख ५२ हजार ०८३ मुले जास्त कुपोषित आहेत.

गुजरातमध्ये कुपोषित मुलांचे प्रमाण ३.२० लाख असून त्यातील १.५५ लाख मध्यम कुपोषित तर १.६५ लाख जास्त कुपोषित आहेत.

देशात कोविड साथीमुळे आरोग्य व पोषणाचा पेच निर्माण झाला असून महिला व बाल कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे की, १७ लाख ७६ हजार ९०२ मुले खूपच कुपोषित असून १५ लाख ४६ हजार ४२० मुले ही मध्यम कुपोषित आहेत, असे १४ ऑक्टोबर २०२१ च्या आकडेवारीत म्हटले आहे.  एकूण ३३ लाख २३ हजार ३२२ मुलांची माहिती ३४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून घेण्यात आली होती. अंगणवाडय़ांत  ८.१९ कोटी मुले असून त्यातील ३३ लाख कुपोषित आहेत. हे प्रमाण एकूण मुलांच्या ४.०४ टक्के आहे. खूपच कुपोषित मुलांचे प्रमाण नोव्हेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ या काळात वाढले असून ते ९ लाख २७ हजार ६०६ ने वाढून आता १७.७६ लाख झाले आहे. पण यात माहिती गोळा करण्याची पद्धत वेगवेगळी होती.

अति कुपोषित मुलांमध्ये सहा महिन्यांपासून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश असून ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून माहिती गोळा करण्यात आली होती. आताच्या आकडेवारीनुसार अंगणवाडी व्यवस्थेतून सर्व वयोगटातील मुलांच्या पोषणाची माहिती संकलित करण्यात आली आहे.

करोना साथ कारणीभूत

चाइल्ड राइटस अँड यू या संघटनेच्या पूजा मारवाह यांच्या मते, या स्थितीस करोनाची साथ  प्रामुख्याने कारणीभूत असून सामाजिक व आर्थिक घटक नकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.