वाराणसी : येथील ज्ञानवापी मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण रविवारी शांततेत पूर्ण झाले. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस होता. आतापर्यंत बहुतांश सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हे कामकाज सुरू आहे.

गेल्या आठवडय़ात या मशिदीच्या व्यवस्थापन समितीने आक्षेप घेतल्यानंतर हे सर्वेक्षण थांबले होते. सर्वेक्षणासाठी न्यायालयाने नियुक्त केलेल्या विधि आयुक्तांना आवारात चित्रीकरण करण्याचा अधिकार नसल्याचा दावा या व्यवस्थापन समितीने केला होता, मात्र न्यायालयाच्या परवानगीने हे सर्वेक्षण सुरू झाले. सोमवारी उर्वरित सर्वेक्षण करण्यात येईल. महिलांच्या एका समूहाने या मशिदीच्या बाहेरील भिंतीलगत असलेल्या देवतांच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी सुरू आहे. ही पाहणी कडक सुरक्षेत सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत केली गेली. याविषयी वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशलराज शर्मा यांनी सांगितले की, न्यायालयाने नियुक्त केलेल्या तीन विधि आयुक्तांसह सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आलेल्या न्यायालयीन आयोगाने सकाळी आठला ही पाहणी सुरू केली.