नवी दिल्ली : भारतातील वायव्येकडील काही भाग आणि द्वीपकल्पीय क्षेत्र वगळता देशाच्या बहुतांश भागांत एप्रिल ते जून दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल, असा इशारा हवामान खात्याने शनिवारी दिला. या कालावधीत मध्य, पूर्व आणि वायव्य भारताच्या बहुतांश भागांत उष्णतेची लाट येईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यंदा एप्रिल ते जून या उष्ण हवामानाच्या कालावधीत देशाचा दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेश आणि वायव्येकडील काही भाग वगळता बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान राहील. वरील भागांत सामान्य किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तापमानाच्या नोंदी ठेवण्याची सुरूवात १९०१मध्ये झाली. त्यानंतर यंदाचा फेब्रुवारी हा आजवरचा ‘सर्वात उष्ण महिना’ नोंदला गेला. तथापि, पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या मार्गात अडथळे निर्माण झाल्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस (२९.९ मिमी या सरासरीऐवजी ३७.६ मिमी) पडला. परिणामी, मार्चमध्ये तापमान नियंत्रणात राहिले, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
एप्रिल महिन्यात पर्जन्यमान सरासरीइतके राहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. १९७१ ते २०२० या कालावधीत जमवलेल्या माहितीच्या आधारे, देशात एप्रिल महिन्यात सरासरी ३९.२ मिमी पाऊस पडतो.
महाराष्ट्रासह १० राज्यांना तडाखा
बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरयाणा या राज्यांच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेचे दिवस अधिक असतील, असे हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
उष्णतेची लाट म्हणजे काय? एखाद्या ठिकाणचे कमाल तापमान पठारी भागात किमान ४० अंश सेल्सिअस, किनारी भगात किमान ३७ अंश सेल्सिअस आणि डोंगराळ भागात किमान ३० अंश सेल्सिअसवर पोहोचले आणि ते सामान्य तापमानापेक्षा किमान ४.५ अंश सेल्सिअस कमी असले, तर तेथे उष्णतेची लाट असल्याचे जाहीर करण्यात येते.