जगातील चार अब्ज लोकांकडे अद्याप इंटरनेट सुविधा नाही. त्यांच्याबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे. त्यांना इंटरनेटच्या परिघात आणण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यासाठीच इंटरनेट डॉट ऑर्गवर आम्ही काम केले. पण त्याचवेळी नेट न्युट्रॅलिटीला इंटरनेट डॉट ऑर्गचा पूर्ण पाठिंबा आहे, असे ‘फेसबुक’चा संस्थापक आणि सीईओ मार्क झकरबर्ग यांने बुधवारी नवी दिल्लीमध्ये सांगितले.
भारत दौऱ्यावर आलेल्या झकरबर्गने बुधवारी दुपारी दिल्ली आयआयटीचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी मनमोकळा संवाद साधला. यामध्ये त्याने अगदी कॅंडी क्रशच्या निमंत्रणांपासून आतापर्यंतच्या प्रवासात केलेल्या चुकांबद्दल खुलेपणाने माहिती दिली. तो म्हणाला, इंटरनेटच्या दृष्टीने तीन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. नेटवर्क, किंमत आणि जागरुकता. या तिन्ही क्षेत्रांमध्ये आम्ही काम करतो आहोत. आज जगात चार अब्ज लोक हे इंटरनेटपासून वंचित आहे. इंटरनेट नसल्यामुळे अनेक संधींपासून ते दूर आहेत. त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे. ज्या व्यक्ती किंवा मुले आजही रुग्णालयापर्यंत किंवा शाळेपर्यंत जाऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने मार्ग काढण्यासाठीही आम्ही काम करतो आहोत. लोकशाही व्यवस्था आणखी मजबूत करून गरिबी निर्मूलनाच्या दिशेने टाकलेले ते एक पाऊल असल्याचे त्याने सांगितले.
ज्या लोकांकडे आता इंटरनेट सुविधा आहे. तेच नेट न्युट्रॅलिटीबद्दल बोलत आहेत. मात्र, ज्यांच्याकडे ही सुविधा उपलब्धच नाही. त्यांचा विचार करणे आपले नैतिक कर्तव्य असल्याचे सांगून तो म्हणाला, केवळ इंटरनेट नसल्यामुळे त्यांचा आवाज दबला जाईल, असे आपण होऊ द्यायला नको. नेट न्युट्रॅलिटीबाबत वेगवेगळ्या देशांतील सरकार नियम तयार करत आहेत. इंटरनेट हे खर्चिक असल्यामुळे संपूर्णपणे ते मोफत उपलब्ध करून देणे कोणालाही शक्य नाही. मात्र, ज्या प्राथमिक सुविधा आहेत. त्या सर्वांसाठी उपलब्ध असाव्यात असे मला वाटते. कमी बॅंडविड्थमध्ये हे देणे शक्य होणार आहे.
फेसबुक जगातील एवढी मोठी नामांकित सोशल नेटवर्किंग साईट असेल, असे सुरुवातीला मला कधी वाटले नाही. मी केवळ माझ्या महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहण्याच्या दृष्टिने याची सुरुवात केली होती. त्यावेळी संपूर्ण जगच या पद्धतीने जोडले गेले तर काय होईल, याचा आम्ही विचार केला आणि त्या दिशेने काम करण्यास सुरुवात केली. एका दिवसात ही गोष्ट साध्य होणे कठीण असते. आम्ही आमचे लक्ष्य निश्चित करून त्या दिशेने काम करत राहिलो, असे त्याने सांगितले.
चुका न करता कोणताच माणूस मोठा होऊ शकत नाही. चुका करत आणि त्यातून शिकतच प्रत्येक व्यक्ती मोठी होते. माझ्याबाबतही तसेच घडले आहे, असेही झकरबर्ग याने यावेळी सांगितले.