पाकिस्तान हा जगातील सर्वात प्रदूषित देश असून बांगलादेश आणि ताजिकिस्तान अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांचे प्रदूषित देश आहेत. ‘आयक्यूएअर’ या स्विस हवा गुणवत्ता तंत्रज्ञान कंपनीने प्रसिद्ध केलेल्या आठव्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालात यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. या यादीत भारताचा क्रमांक सहावा आहे. चाड आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ द काँगो हे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत.
दुसऱ्या महासत्तेचे स्थान मिळवलेला चीन २०व्या क्रमांकाच प्रदूषित देश आहे. अमेरिका १२०व्या तर ११०व्या क्रमांकावर ब्रिटन आहे. केवळ फ्रेंच पॉलिनेशिया, पोर्तो रिको, अमेरिका व्हर्जिन बेटे, बार्बाडोस, न्यू कॅलेडोनिया, आइसलँड, बर्म्युडा, रियुनियन, अँडोरा, ऑस्ट्रेलिया, ग्रेनाडा, पनामा आणि एस्टोनिया या १३ देश आणि प्रदेशांनी पीएम-२.५ कणांविषयी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे. प्रदूषणाचा सर्वाधिक घातक परिणाम लहान मुलांवर होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
१४३ देश किंवा प्रदेशांपैकी १३० म्हणजे ९१ टक्के देश-प्रदेशांनी ‘डब्ल्यूएचओ’च्या मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन केले आहे. जगातील सर्वाधिक २५ प्रदूषित शहरे भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये आहेत. सर्वाधिक चार प्रदूषित शहरांपैकी तीन शहरे भारतात आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०२५मध्ये जंगलांना आगी लागल्यामुळे ज्या भागांमध्ये तुलनेने कमी पीएम-२.५ कण असत त्यावर विपरित परिणाम झाला. २०२४मध्ये १७ टक्के शहरांनी ‘डब्ल्यूएचओ’च्या मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन केले होते, २०२५मध्ये हे प्रमाण १४ टक्क्यांपर्यंत घसरले.
सर्वाधिक प्रदूषित शहरे
उत्तर प्रदेशातील लोनी, चीनमधील होतान, मेघालयातील बर्निहाट, दिल्ली आणि पाकिस्तानातील फैसलाबाद या क्रमांकाने सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत.
डेटा संकलन
१४३ देश, प्रदेश आणि भूप्रदेशांमधून ९,४४६ शहरांमधील ४० हजारांपेक्षा जास्त देखरेख केंद्रे आणि कमी खर्चिक सेन्सरकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सरकारी संस्था, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, खासगी उद्योग आणि जगभरातील नागरिक शास्त्रज्ञ यांच्याद्वारे ही केंद्रे आणि सेन्सर चालवली जातात.
