पेट्रोल-डिझेलसह वाढलेल्या महागाईत दूधाच्या किमतीची भर पडली आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या आठवड्यात अमूलने दूध विक्रीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. अमूलपाठोपाठ महाराष्ट्रातील सर्वांत मोठा सहकारी दूध संघ असलेल्या ‘गोकुळ’ने शुक्रवारी आपल्या दुधाच्या खरेदी आणि विक्री किमतीमध्ये वाढ असून, आता मदर डेअरीच्या दूधाचे दरही वाढवण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे मदर डेअरीने फक्त दिल्ली आणि एनसीआरमध्येच दरवाढ केली आहे. त्यामुळे दिल्ली-एनसीआर वगळता इतर ठिकाणच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
अमूल आणि गोकूळनंतर मदर डेअरीने दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मदर डेअरीचे वाढीव दर उद्यापासून (११) लागू करण्यात आले आहेत. आता मदर डेअरीचं दूध खरेदी करताना दिल्ली आणि एनसीआरमधील ग्राहकांना दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. मदर मदर डेअरीने यापूर्वी २०१९ मध्ये दूधाच्या दरांमध्ये वाढ केली होती. सर्व प्रकारच्या दूधावर ही दरवाढ लागू असणार आहे, अशी माहिती मदर डेअरीने दिली आहे. गेल्या वर्षभरात महागाई प्रचंड वाढली असून, कंपनीलाही महागाईचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर करोना महामारीमुळे दूध उत्पादनावरही परिणाम झाला असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
हेही वाचा – ‘गोकुळ’ दुधाच्या खरेदी-विक्री दरात वाढ
दिल्ली-एनसीआरमध्ये एक लिटर क्रीम दूध ५५ रुपयांऐवजी ५७ रुपयांना मिळणार आहे. टोन्ड दूधाचे दरही ४५ रुपयांवरून ४७ रुपये झाले आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये मदर डेअरी दिवसाला ३० लाख लिटरपेक्षा अधिक दूधाची विक्री करते. इंधनाचे वाढते दर आणि मनुष्यबळाचा वाढलेल्या खर्चामुळेही ही दरवाढ करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mother Dairy raises its liquid milk prices by Rs 2/litre in Delhi NCR with effect from July 11, 2021. The new prices will be applicable for all milk variants. The milk prices were last revised about 1.5 years ago in December 2019. pic.twitter.com/YzzbMVhYwv
— ANI (@ANI) July 10, 2021
मुंबई-पुणे विभागातील नागरिकांनाही दूध दरवाढीची झळ
राज्यातील सर्वांत मोठा सहकारी दूध संघ असलेल्या ‘गोकुळ’ने शुक्रवारी आपल्या दुधाच्या खरेदी आणि विक्री किमतीमध्ये वाढ केली. यामध्ये म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये, तर गाईच्या दूध दरात एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. याच वेळी कोल्हापूर विभाग वगळता मुंबई-पुणे महानगरातील दूध विक्रीच्या दरात दोन रुपये वाढ करण्यात आली आहे. ‘गोकुळ’तर्फे मुंबईमध्ये प्रतिदिन आठ लाख लिटर, तर पुण्यामध्ये तीन लाख लिटर दुधाची विक्री केली जाते.