Dwarka Road Crash: मागच्या आठवड्यात दिल्लीतील दिल्लीतील द्वारका येथे एका एसयूव्ही गाडीने मारलेल्या धडकेत २३ वर्षीय दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता मृत मुलाच्या आईने धक्कादायक आणि गंभीर आरोप केला आहे. सदर अपघातासाठी जबाबदार असणारा कथित १७ वर्षीय मुलगा रिल बनविण्यासाठी गाडी घेऊन बाहेर पडला होता, असा दावा मृत मुलाच्या आईने केला आहे. या अपघाताचा एक नवीन व्हिडीओ समोर आल्यानंतर हा आरोप करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओमध्ये आरोपी चालकाशेजारी त्याची बहीण बसलेली आहे. दोघे फेरफटका मारण्यासाठी गाडी घेऊन बाहेर पडले होते. यावेळी ते रिल बनवत असताना समोरून येणाऱ्या २३ वर्षीय दुचाकीस्वाराला जोरदार धडक बसली.

या अपघातात साहिल धनशेरा नामक दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. चालक अल्पवयीन असून त्याची बहिणही अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस सध्या तिने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओची चौकशी करत आहेत.

नेमके प्रकरण काय आहे?

3 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील द्वारका येते कथित अल्पवयीन चालकाने स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने चालवत साहिल धनशेराच्या दुचाकीला धडक दिली. यानंतर अल्पवयीन चालकाला पकडून बालसुधार मंडळाकडे पाठविण्यात आले. मात्र दहावीची परिक्षा असल्यामुळे त्याला जामीन देण्यात आला आहे.

मृत मुलाच्या आईचे आरोप

मृत साहिल धनशेराची आई इन्ना माकन यांनी सांगितले की, साहिल त्यांचा एकुलता एक मुलगा असून त्या एकल पालक आहेत. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी आरोप केला की, माझ्या मुलाला उडवल्यानंतर आरोपी चालकाच्या बहिणीने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तसेच ज्यावेळी अपघात झाला त्यानंतरही आरोपी चालक थांबला नाही. त्याने वेगात गाडी दामटवून आणखी काही वाहनांना धडक दिली.

आरोपी आणि त्याच्या पालकांविरोधात कारवाईची मागणी

इन्ना माकन यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना अल्पवयीन आरोपी चालक आणि त्याच्या पालकांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. “या श्रीमंतांच्या मुलांना वाटते की, ते काहीही करतील, रस्त्यावर लोकांच्या अंगावर गाड्या घालतील आणि त्यातून सही सलामत सुटतील. त्यामुळेच त्यांच्याकडून अशाप्रकारचे गुन्हे घडत आहेत. माझा मुलाचा नाहक बळी गेला. पण यापुढे कुणाही मुलाचा बळी जाऊ नये म्हणून आरोपी मुलगा आणि त्याला गाडी देणाऱ्या पालकांवर कठोर कारवाई व्हावी”, असेही माकन म्हणाल्या.