Sell Newborn Girl : लागोपाठ पाच मुली झाल्याने एका निर्दयी आईने तिच्या पाचव्या मुलीचा चक्क दोन लाखांत सौदा केलाय. मुल नसलेल्या जोडप्याला तिने या नवजात बालकाला विकलं. लुधियानामधून हा प्रकार समोर आला असून या महिलेला अटक करण्यात आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
या नवजात बाळाला विकण्याकरता बाळाची आई गुरुद्वारा छेविन पताशाहीजवळ एका उद्यानात उभी होती. तिथे तिचा मनदीप कौर नावाच्या महिलेबरोबर या बाळाच्या विक्रीचा सौदा सुरू होता. तेथील एका स्थानिक व्यक्तीने दोघांमधील चर्चा ऐकली आणि त्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्या माहितीच्या आधारे तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि हा सौदा हाणून पाडला. बाळाची विक्री होण्यापूर्वीच पोलिसांनी आईला ताब्यात घेतलं.
पाचवी मुलगी नको म्हणून विक्री
अतिरिक्त डीसीपी समीर वर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “सुनीता यांनी १३ फेब्रुवारी रोजी एका खाजगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. आधी चार मुली असल्याकारणाने तिला पाचवी मुलगी नको होती. तिने या विषयावर तिचा मित्र प्रवीणशी चर्चा केली. त्याने रुग्णालयातील नर्सबरोबर संपर्क साधला. ज्याने रुग्णालयातील एका नर्सशी संपर्क साधला.”
पाच जणांना अटक, दोघेजण फरार
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी बाळाची आई, बाळाची खरेदी करण्याकरता आलेली महिला, त्यांना मदत करणारी डॉक्टर, नर्स आणि आणखी एकाला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. सुनीता देवी असं नवजात बाळाच्या आईचं नाव असून मनदीप कौर ही महिला हे नवजात बाळ खरेदी करणार होती. तर, प्रवीण, (सुनीताची मैत्रीण), मनमीत कौर (बीएएमएस डॉक्टर) आणि तिची सहकारी रुची यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, पम्मा ही आशा कार्यकर्ता, तिची सहकारी गुरमीत कौर अद्यापही फरार आहेत.
महाराष्ट्रातही गंभीर प्रकार समोर
दरम्यान, महाराष्ट्रातही असाच प्रकार काही दिवसांपूर्वी उजेडात आला. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून नवजात बालिकेवर नागपूर येथे उपचार करण्यासाठी नेत असल्याच्या नावाखाली अडीच लाखात मुलीची विक्री करण्याचे प्रकरण ३ फेब्रुवारी रोजी उघडकीस आले. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला गोंदिया येथील न्यू बालाजी हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितेश बाजपेयी यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोघांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली होती तर मुख्य सूत्रधार असलेल्या डॉ. बाजपेयी याचा शोध सुरू होता.

